Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात तापमान 43 अंशांच्या उंबरठ्यावर

* नागरिक हैराण ; दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे धोकादायक

* प्रशासनाकडून सावधगिरीचे आवाहन, पाणी पिण्यावर भर देण्याची सूचना

नगरदेवळा / मुझफ्फर सय्यद :- नगरदेवळा परिसरात गेल्या 4-5 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून आज तापमान तब्बल 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रखर उन्हासोबतच वाढलेल्या उकाड्यामुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवसभर आकाश स्वच्छ होते. कडक ऊन आणि उष्ण वारे यामुळे भीषण गर्मी जाणवत होती. सकाळपासूनच तापमानात वाढ होत असून दुपारी परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. भर उन्हात रस्त्यावर निघणारे नागरिक, मजूर, रिक्षाचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


नगरदेवळा आणि परिसरातील अनेक भागांमध्ये पंखे, कूलर आणि एसी असूनही नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही होत असून विशेषतः जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत बाजारपेठ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी थंड पाणी, सरबत आणि ज्यूस केंद्रांवर गर्दी वाढली आहे.


या भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरावी, हलके आणि सूती कपडे परिधान करावेत, असा सल्ला देण्यात येत आहे.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी, उलट्या किंवा हीटस्ट्रोकसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबीयांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.


उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे शेतकरी आणि दिवसभर उन्हात काम करणाऱ्या मजुरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतातील कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अनेकांनी दुपारच्या वेळेत बाहेरची कामे टाळण्यास सुरुवात केली आहे.


नगरदेवळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही नागरिकांना उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त केल्याने नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement