* आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
* पुलाचे नूतनीकरण, संरक्षक कठडे आणि 4 किमी रस्त्याचे डांबरीकरण होणार
* 'दै. कोकण प्रदेश न्यूज'च्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- 'दै. कोकण प्रदेश न्यूज'मध्ये 29 मे 2026 रोजी "कान तुटलेला ‘बहिरा’ पूल आणि मुकं प्रशासन!" या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरदेवळा येथील शिवसेना नेत्यांनी घेतली असून गडद नदीवरील धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसह नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशन या मार्गांवरील रस्त्यांच्या विकासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिपक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पामध्ये गडद नदीवरील पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तसेच नगरदेवळा गावापासून नगरदेवळा रेल्वे स्टेशनपर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे सध्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करणे शक्य नसले तरी पावसाळ्यानंतर तातडीने कामे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामांतर्गत पुलाच्या दोन्ही बाजूंना नवीन आणि मजबूत संरक्षक कठडे बसविणे, पुलावरील खड्डे बुजविणे, पुलाचे नूतनीकरण करणे तसेच नगरदेवळा ते स्टेशन रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात येणार आहे.
* आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा :- याबाबत अधिक माहिती देतांना शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांनी सांगितले की, भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या पूल व रस्त्याच्या कामांसाठी राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या विकासकामांसाठी निधी मंजूर होऊ शकला.
नगरदेवळा गावातील नागरिकांच्या दृष्टीने हा पूल आणि रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन या मार्गाचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच सागर पाटील, युवा नेते गणेश देशमुख, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदींनी निवेदन दिले होते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये गडद नदीवरील पुलाची धोकादायक अवस्था, तुटलेले संरक्षक कठडे आणि संभाव्य अपघाताचा धोका याकडे लक्ष वेधण्यात आले होते. नगरदेवळा हे सुमारे 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव असून रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना हाच मार्ग वापरावा लागतो.
दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि इतर वाहने या पुलावरून प्रवास करीत असतात. त्यामुळे पुलाची जीर्ण अवस्था आणि कठड्यांचा अभाव हा नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला होता.
* नागरिकांमध्ये समाधान :- दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीबाबत आणि रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर नगरदेवळा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थांनी वृत्ताची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी तसेच दै. कोकण प्रदेश न्यूजचे आभार व्यक्त केले आहेत.
आता पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊन गडद नदीवरील पूल सुरक्षित आणि नगरदेवळा-स्टेशन मार्ग सुकर होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Social Plugin