* केदारनाथ धाम येथे आकस्मिक निधन
* कर्जत शहर व तालुक्यात शोककळा
* हरिद्वार येथेच होणार अंत्यसंस्कार
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत येथील रहिवासी तथा सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व कै. हेमंत (नंदू) दत्तात्रय डोंबे यांचे केदारनाथ यात्रेदरम्यान 27 मे रोजी केदारनाथ धाम येथे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच डोंबे परिवारासह कर्जत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत (नंदू) डोंबे हे धार्मिक भावनेतून केदारनाथ यात्रेसाठी गेले होते. मात्र यात्रेदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
सध्या केदारनाथ, ऋषीकेश आणि हरिद्वार परिसरात वाहतुकीच्या अडचणी, घाट मार्गांवरील परिस्थिती तसेच प्रतिकूल हवामानामुळे त्यांचे पार्थिव कर्जत येथे आणणे शक्य होत नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे कै. हेमंत (नंदू) डोंबे यांच्यावर 29 मे 2026 (शुक्रवार) रोजी सकाळी 9.30 वाजता हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती डोंबे परिवाराने दिली आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तस्वकीय असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत, मनमिळावू आणि सर्वांशी आत्मीयतेने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. या दुःखद प्रसंगी समीर चंद्रकांत डोंबे व डोंबे परिवार यांनी संवेदना व्यक्त करणाऱ्या सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत. "ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि डोंबे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो," अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.


Social Plugin