Type Here to Get Search Results !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

* मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय : जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

* सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते’ नाव देण्यालाही मंजुरी

मुंबई / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. आगामी ‘जनगणना 2027’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र यंदा देशभरात ‘जनगणना 2027’चा पहिला टप्पा सुरू होत असून 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरगणना आणि घरयादी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने जनगणनेच्या काळात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय अडथळे टाळण्यासाठी आणि जनगणनेचे काम सुरळीत पार पडावे यासाठी राज्य सरकारने बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.


* बदली अधिनियमात सुधारणा :- या निर्णयासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005’मध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत अध्यादेश राज्यपालांच्या मंजुरीनंतर जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


* सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव :- मंत्रिमंडळ बैठकीत कोकणवासीयांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि माजी अर्थमंत्री स्वर्गीय मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे अधिकृत नाव “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे करण्यात येणार आहे.


* कोकण रेल्वे प्रकल्पासाठी मोठे योगदान :- स्व. मधु दंडवते यांनी रेल्वेमंत्री असतांना कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून कोकणवासीयांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement