* शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा - सुव्यवस्थेसाठी प्रशासन सतर्क
* संवेदनशील भागांत वाढवली गस्त, नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
खोपोली / प्रतिनिधी :- आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरासह शिळफाटा परिसरात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खोपोली पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अफवा आणि गैरसमजांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहूल यांच्या नेतृत्वात तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला.
खोपोली शहरातील प्रमुख मार्ग, संवेदनशील भाग तसेच शिळफाटा परिसरातून पोलिसांचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीने फिरविण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहन पथक तसेच विविध सुरक्षा यंत्रणांचा सहभाग होता. रूट मार्चदरम्यान नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.
बकरी ईदचा सण शांततेत, उत्साहात आणि धार्मिक सौहार्द जपत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी नागरिकांना परस्पर आदर, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे पालन करीत बकरी ईदचा सण आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहूल यांनी “प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, मात्र सण-उत्सव साजरे करतांना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे,” असे सांगत नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, बकरी ईदच्या निमित्ताने खोपोली शहरात बंधुता, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सलोखा कायम राखत सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने खोपोलीकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Social Plugin