* नागरिकांचा संताप : नगरसेवक विष्णू माने आणि पत्रकार अविनाश मुळीक यांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती
कुपवाड - सांगली / प्रतिनिधी :- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील अष्टविनायक नगर, गल्ली क्रमांक 3 येथे एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामादरम्यान 300 मिमी डी. आय. पाणीपुरवठा लाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून संबंधित कामावरील सुपरवायझर निष्काळजीपणे वागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वीही याच भागात चार इंची डी. आय. लाईनचे लिकेज झाले होते. त्यावेळी दुरुस्ती करण्यासाठी तब्बल दोन दिवस लागले होते. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, प्रभागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनताच चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक विष्णू माने यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पत्रकार आणि प्रशासनाशी संपर्क साधून काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाचे तीन नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणात 'दै. कोकण प्रदेश न्यूज'चे पत्रकार अविनाश मुळीक यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना धारेवर धरले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
नागरिकांनी मागणी केली आहे की, भविष्यात अशा कामांदरम्यान पाणीपुरवठा लाईनचे नुकसान होऊ नये यासाठी महापालिकेने संबंधित कंत्राटदारांवर कठोर नियंत्रण ठेवावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.


Social Plugin