Type Here to Get Search Results !

पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीतील कथित अवैध शिपाई भरती प्रकरण तापले

* ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ? चौकशीच्या आदेशानंतरही कारवाई नसल्याचा आरोप

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द (प्र. भ.) येथील कथित अवैध शिपाई भरती प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रार अर्ज, माहिती अधिकार अर्ज तसेच वरिष्ठ कार्यालयांकडे पाठपुरावा करूनही चौकशी रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीतील रिक्त असलेले शिपाई पद सरपंच, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांनी कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन नियमांनुसार पदभरतीची माहिती ग्रामसभेत देण्यात आली नाही, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील इच्छुक तरुणांना अर्ज करण्याची संधी मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या संदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाचोरा यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच माहिती अधिकारांतर्गत शिपाई भरतीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. काही ग्रामपंचायत सदस्यांनीही या भरती प्रक्रियेबाबत आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, पंचायत समिती पाचोरा कार्यालयाकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आदेश होऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशी पूर्ण झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.


तक्रारदार सुरेश तंगा पाटील यांनी जिल्हा परिषद जळगाव तसेच पंचायत समिती पाचोरा कार्यालयाकडे पुन्हा निवेदन सादर करून, संबंधित भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या नियमांना डावलून झालेल्या भरतीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement