* कै. अमिषकुमार त्रिभुवन गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयाच्या सेवापूर्ती सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
नगरदेवळा / प्रतिनिधी :- कै. अमिषकुमार त्रिभुवन गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला तात्याजी शेलार या तब्बल 33 वर्षे 11 महिन्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक सेवेनंतर शनिवार, 30 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सत्कार समारंभात त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि सन्मानाचा वर्षाव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सौ. माणिकराजे शिवराज पवार ट्रस्टच्या अध्यक्षा वंदनाताई दिग्विजय पवार होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये अँड. योगेश जगन्नाथ पाटील, धैर्यशील कृष्णराव पवार, प्रा. रविंद्र भिकनराव चव्हाण, अर्जुन दिग्विजय पवार, गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार, विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्र प्रमुख चंद्रकांत मोराणकर, माजी विभागीय अधिकारी चंद्रकांत छगनराव शेलार, मुख्याध्यापक विजयकुमार तात्याजी शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्राम शिक्षण समितीचे व्हाईस चेअरमन शिवनारायण जाधव, माजी सरपंच अरुण काटकर, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात विविध संस्था, शैक्षणिक संघटना आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीमती शेलार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्याचा गौरव करतांना वक्त्यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्रीमती चंद्रकला शेलार यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम करतांना शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधला. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. अनेक विद्यार्थिनींच्या जीवनाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
यावेळी उपस्थित शिक्षक, सहकारी आणि मित्रपरिवाराने त्यांच्या कार्यातील विविध आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी त्यांना आदर्श शिक्षिका, कुशल प्रशासक आणि विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असे संबोधले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना श्रीमती चंद्रकला शेलार यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करतांना सहकारी शिक्षक, व्यवस्थापन, पालक आणि विद्यार्थिनींचे आभार मानले. शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची मिळालेली संधी ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सेवापूर्ती समारंभाने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण केल्या. उपस्थितांनी श्रीमती चंद्रकला शेलार यांना उत्तम आरोग्य, सुखी आणि आनंदी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.


Social Plugin