Type Here to Get Search Results !

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते

* विद्यमान अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची मुंबईत बदली

* गृह विभागाचे आदेश जारी ; राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना

चाळीसगाव / फारूख शेख :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. या व्यापक प्रशासकीय फेरबदलांमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक पदावर अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची बदली बृहन्मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी करण्यात आली आहे.

गृह विभागाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले असून राज्यातील विविध महत्त्वाच्या शहरांतील पोलीस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.


राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांतील पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकारी प्रवीण मुंढे आणि मोक्षदा पाटील यांना पदोन्नती देत बृहन्मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदी विजय खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशाल गायकवाड यांची पुणे लोहमार्ग अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, फोर्स वनचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची बदली दहशतवाद विरोधी पथक (ATS) मुंबई येथे करण्यात आली आहे.


राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) उज्ज्वला वानकर, रमेश चोपडे आणि वैशाली शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील गुप्तवार्ता आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत नवीन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये करण्यात आली आहे. प्रशिक्षण आणि पोलीस प्रशासन क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग अकादमीमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.


या आदेशात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.


राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, हे सर्व फेरबदल प्रशासकीय निकड, कायदा-सुव्यवस्थेची आवश्यकता आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार करण्यात आले आहेत. दरम्यान, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते यांच्या नियुक्तीकडे जळगाव जिल्ह्यात विशेष लक्ष लागले असून कविता नेरकर यांच्या मुंबईतील नव्या जबाबदारीबद्दलही विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement