Type Here to Get Search Results !

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 7 लाखांची फसवणूक

* क्लार्क पदावर नियुक्तीचे आश्वासन

* पाचोरा तालुक्यातील प्रकार

* आरोपीविरोधात गुन्हा दाखल

* 10 लाख घेतल्यानंतर केवळ 3 लाख परत

पाचोरा / प्रतिनिधी :- मंत्रालयात क्लार्क पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुनील जाधव (वय 34, व्यवसाय - शेती, रा. मोहाडे, ता. पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी शिरीष मंगलनाथ जोशी (रा. पिरोळा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


* मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष :- फिर्यादीनुसार, आरोपी शिरीष जोशी याने मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपीने फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावता आरोपीने केवळ 3 लाख रुपये परत केले आणि उर्वरित 7 लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचे समोर आले आहे.


* जवळपास चार वर्षे सुरू होता प्रकार :- तक्रारीनुसार, हा प्रकार 29 सप्टेंबर 2022 पासून ते 19 मे 2026 पर्यंत सुरू होता. वारंवार पाठपुरावा करूनही नोकरी न लागल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने फिर्यादीला संशय आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


* भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल :- या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी हिरालाल पाटील करीत आहेत.


* सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका :- दरम्यान, सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. “ओळखीने नोकरी”, “मंत्रालयात सेटिंग” किंवा “पैसे दिले तर सरकारी नोकरी” अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement