Type Here to Get Search Results !

पावसाळ्यापूर्वी वसई-विरार महानगरपालिका सतर्क

* महापौर व उपमहापौरांनी केली नालेसफाई कामांची पाहणी

* सनसिटी, गास, निर्मळ परिसरातील नाले, गटारे आणि तलावांची पाहणी

* नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज - महापौर अजीव पाटील

वसई / नरेंद्र एच. पाटील :- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, पूरस्थिती आणि अस्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत विविध भागांमध्ये नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी महापौर अजीव पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांनी संबंधित नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह केली.

21 मे 2026 रोजी झालेल्या या पाहणी दौऱ्यात सनसिटी वसई (प.), गास, निर्मळ परिसरासह विविध भागांतील नालेसफाई, गटारे आणि पाणी निचऱ्याच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि अन्य अडथळे तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.


यावेळी परिसरातील तलावांचीही पाहणी करण्यात आली. तलाव परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पावसाळ्यापूर्वी साफसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरातील पाणी निचरा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.


महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासन आवश्यक उपाययोजना राबवत आहे. नालेसफाईची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे.


उपमहापौर मार्शल लोपीस यांनी नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा टाकू नये तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. “नागरिकांच्या सहभागामुळे शहर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल,” असे त्यांनी सांगितले.


या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक परेश किणी, नगरसेविका दिप्ती भोईर, नगरसेविका सॅरल डाबरे, माजी सरपंच सायमन अल्मेडा, सालू अल्मेडा, स्थानिक नागरिक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेमार्फत पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement