Type Here to Get Search Results !

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांच्या मृत्यूंवरून रिपब्लिकन पक्ष आक्रमक

* बोरिवलीतील रेस्क्यु सेंटरची सखोल चौकशी करण्याची मागणी

* कुमार जीत आठवले यांच्या नेतृत्वात नॅशनल पार्क गेटवर “टाळे ठोको” आंदोलन

* चौकशी नाही झाली तर रेस्क्यु सेंटर बंद पाडू - रिपब्लिकन पक्षाचा इशारा

मुंबई / प्रतिनिधी :- बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन छेडले आहे. नॅशनल पार्कमधील रेस्क्यु सेंटरमध्ये वारंवार वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप करीत रिपब्लिकन पक्षाने शुक्रवारी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर “टाळे ठोको” आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांनी केले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यु सेंटरच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करीत सखोल चौकशीची मागणी केली.


* दत्तक घेतलेल्या बिबळ्याचा मृत्यू :- संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वन्यप्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेस्क्यु सेंटरमध्ये विविध वन्यप्राण्यांना दत्तक घेण्याची योजना राबविण्यात येते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेला बिबळया वाघ 17 मे रोजी मृत्यू पावल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी दत्तक घेतलेला “भीम” नावाचा पँथर देखील याच रेस्क्यु सेंटरमध्ये मृत्यू पावला होता. त्यामुळे या रेस्क्यु सेंटरमधील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, रेस्क्यु सेंटरमध्ये अनेक प्राणी संशयास्पद परिस्थितीत मृत्यूमुखी पडत आहेत. मात्र या घटनांची पारदर्शक चौकशी होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.


* चौकशी न झाल्यास रेस्क्यु सेंटरला टाळे :- रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी इशारा देत सांगितले की, वन्यप्राण्यांच्या मृत्यूंची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली नाही तर रिपब्लिकन पक्ष रेस्क्यु सेंटरला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी वनविभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत वन्यप्राण्यांच्या देखभालीत गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला.


* आंदोलनात अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग :- बोरीवली येथील नॅशनल पार्क प्रवेशद्वारावर झालेल्या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, ॲंड. अभयाताई सोनवणे, मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु, हरिहर यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.


* चौकशी समितीत पोलिस आणि तज्ज्ञ डॉंक्टरांचा समावेश करण्याची मागणी :- वन्यप्राण्यांच्या मृत्यूंची चौकशी करतांना केवळ वनविभागापुरती चौकशी मर्यादित न ठेवता त्यामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉंक्टर आणि स्थानिक पोलिसांचा समावेश करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.


दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी सांगितले की, प्राण्यांचे मृत्यू संशयास्पद आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशी समितीत स्वतंत्र यंत्रणांचाही समावेश केला पाहिजे.


दरम्यान, मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी स्थानिक पोलिसांचा चौकशी समितीत समावेश करण्यास नकार दिल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


* पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर कारवाईचे संकेत :- मृत्यू पावलेल्या बिबळया वाघाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मंगळवारी अपेक्षित असून त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे संजय गांधी नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र संघटनांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement