Type Here to Get Search Results !

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये ‘अमोल पर्व’ ?

* पाचोर्‍याच्या युवा चेहऱ्याला संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोर

* मंत्री गिरीश महाजन आपल्या ‘मानसपुत्रा’साठी फिल्डिंग लावणार का ?

* जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापले, महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा

* पाचोरा-भडगावमधील भाजपच्या पुनर्बांधणीसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत

* गुलाबराव पाटील, किशोर आप्पा पाटील यांच्या वारसदारांच्या चर्चेत भाजपकडून नवा चेहरा पुढे येणार ?

पाचोरा / फिरोज पिंजारी :- आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला असून जळगाव जिल्ह्यात भाजपकडून उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत. भाजपचे युवा नेते अमोल शिंदे यांचे नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, राजकीय बॅनरबाजी, स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका आणि वृत्तपत्रांमधील चर्चांमुळे अमोल शिंदे यांचे नाव अधिक चर्चेत आले आहे. “कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला… राजकीय वनवास संपुष्टात येणार ?” अशा आशयाचे बॅनर सध्या पाचोरा आणि भडगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत.

* मंत्री गिरीश महाजन यांचे ‘मानसपुत्र’ म्हणून ओळख :- राज्याचे मंत्री तथा भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून अमोल शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी संघटनात्मक पातळीवर पक्षासाठी सातत्याने काम केले असून कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, निवडणूक व्यवस्थापन आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांचे पक्षातील वजन वाढल्याचे बोलले जात आहे.


भाजपमधील अनेक कार्यकर्ते उघडपणे सांगतात की, पाचोरा तालुक्यात भाजपचे अस्तित्व मजबूत ठेवण्यात आणि वाढविण्यात अमोल शिंदे यांचा मोठा वाटा राहिला आहे. विशेषतः आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रभावी राजकीय वर्चस्वाच्या काळात भाजप संघटन टिकवून ठेवणे ही मोठी कसरत मानली जात होती. अशा परिस्थितीत अमोल शिंदे यांनी पक्ष संघटन उभे ठेवण्यासाठी सातत्याने मेहनत घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


* महायुतीत मैत्री की शीतयुद्ध ? :- राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून एकत्र असले तरी जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. विशेषतः भडगाव-पाचोरा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील स्पर्धा उघड असल्याची चर्चा आहे. 


पाचोरा आणि भडगाव नगर परिषद निवडणुकांदरम्यान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी युती तोडण्याची भूमिका घेत भाजपला थेट आव्हान दिले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि इतर भाजप नेत्यांनी जोरदार ताकद लावूनही शिवसेनेने दोन्ही नगर परिषदांवर एकहाती सत्ता मिळवली होती. या पराभवानंतर भाजपमध्ये आत्मपरीक्षण सुरू झाले होते. 


राजकीय जाणकारांच्या मते, आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा मजबूत ताकद उभी करायची असेल तर स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व पुढे आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी अमोल शिंदे यांना विधान परिषदेत संधी देणे हा भाजपसाठी ‘राजकीय मास्टरस्ट्रोक’ ठरू शकतो, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.


* जिल्ह्यात वारसदार राजकारणाची चर्चा :- दरम्यान, विधान परिषदेसाठी विविध पक्षांतून वारसदारांची नावेही चर्चेत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांचेही नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.


या पार्श्वभूमीवर भाजपकडून युवा, संघटनप्रिय आणि कार्यकर्त्यांशी जोडलेला चेहरा पुढे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अमोल शिंदे यांच्या नावाला अधिक बळ मिळत असल्याचे सांगितले जात आहे.


* भाजपमध्ये तीन नावांची चर्चा :- विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन, नंदकुमार अडवाणी आणि अमोल शिंदे या नावांची चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र स्थानिक पातळीवरील संघटन, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेली जवळीक यामुळे अमोल शिंदे यांचे पारडे सध्या जड असल्याचे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहेत.


* “संकटमोचक” प्रतिमा ठरणार निर्णायक ? :- जळगाव जिल्ह्यात अनेक निवडणुकांमध्ये संघटनात्मक संकटाच्या काळात कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम अमोल शिंदे यांनी केले असल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांची “संकटमोचक” अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेले निकट संबंधही त्यांच्या राजकीय वजनात भर घालत असल्याचे बोलले जात आहे.


* आता सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे :- सध्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा शिगेला पोहोचली आहे. मंत्री गिरीश महाजन आपल्या ‘मानसपुत्रा’ला विधान परिषदेची उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी होणार का ? आणि पाचोरा तालुक्याला आणखी एक आमदार मिळणार का ? याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement