* अंजरून गावातील नैसर्गिक नाल्यात महावितरणचे हायटेंशन खांब उभारल्याचा गंभीर आरोप
* हजारो ब्रास मुरूम भराव टाकून नाल्याचा प्रवाह बदलल्याची चर्चा
* दुर्घटना झाल्यास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - पत्रकार राजेंद्र जाधव
* पाटबंधारे विभाग, महावितरण आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त सवाल
खालापूर / विशेष प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कामांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माणकिवली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंजरून गावाच्या हद्दीत एका प्रभावशाली व्यावसायिकाने हजारो ब्रास मुरूम आणि मातीचा भराव टाकून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आता महावितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित नैसर्गिक नाल्याच्या मध्यभागीच महावितरण कंपनीने हायटेंशनचे खांब उभे करून विद्युत वाहिनी टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पावसाळ्यात हा नाला नदीप्रमाणे वेगाने वाहत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
* नाल्याच्या मध्यभागी हायटेंशन लाईन, जीव धोक्यात ? :- स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अंजरून परिसरातील हा नैसर्गिक नाला पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहतो. परिसरातील शेतकरी शेतीच्या कामासाठी या नाल्यातून सतत ये-जा करतात. पहिल्या पावसानंतर अनेक ग्रामस्थ मासेमारीसाठी देखील या भागात जात असतात. अशा परिस्थितीत नाल्याच्या मध्यभागी उभारलेले हायटेंशनचे खांब भविष्यात विजेचा धक्का लागून मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एखाद्या दिवशी पावसाच्या पाण्यात करंट उतरला किंवा खांब कोसळले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
* परवानगी कोणाची ? नियम काय ? :- महावितरण कंपनीने नैसर्गिक नाल्याच्या मध्यभागातून हायटेंशन लाईन टाकण्यासाठी कोणत्या विभागाची परवानगी घेतली ? संबंधित व्यावसायिकाला वीजपुरवठा देण्यासाठी कोणत्या नियमांनुसार ही प्रक्रिया करण्यात आली ? याबाबत संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी मागणी पत्रकार राजेंद्र जाधव आणि स्थानिक शेतकरी करीत आहेत.
त्याचप्रमाणे, नैसर्गिक नाला खोदणे, भराव टाकणे किंवा प्रवाह बदलण्यासाठी पाटबंधारे विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असतांना संबंधित व्यावसायिकाने अशी परवानगी घेतली होती का ? याबाबतही पाटबंधारे विभागाने खुलासा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
* “पाहतो… करतो…” उत्तरांवर ग्रामस्थ संतप्त :- या संपूर्ण प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश मेंगाळ यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पत्रकार आणि शेतकऱ्यांचे फोन उचलले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही वेळा संपर्क झाल्यानंतर “पाहतो”, “करतो”, “अर्ज करा” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे “पाटबंधारे विभाग कोमात गेला आहे का ?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
* नदीपात्रांवर अतिक्रमणांचे आरोप :- दरम्यान, खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीपात्र आणि नैसर्गिक नाल्यांमध्ये मातीचे भराव टाकून लोखंडी पत्र्यांची कंपाउंड उभारली जात असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक पायवाटा बंद झाल्याने शेतकरी आणि आदिवासी बांधवांमध्ये नाराजी वाढली आहे.
ग्रामस्थांच्या मते, “पैशांच्या जोरावर नैसर्गिक प्रवाह आणि सरकारी जागांवर कब्जा करण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाई होतांना दिसत नाही.”
* दुर्घटना झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- पत्रकार राजेंद्र जाधव यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून पावसाळ्यात हायटेंशन लाईनमुळे विजेचा धक्का लागून कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच गायरान आणि नैसर्गिक नाल्याच्या जागेत महावितरण कंपनीने कोणत्या कायद्यांतर्गत आणि कोणाच्या परवानगीने हायटेंशनचे खांब उभे केले, याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माहिती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात महावितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, अंजरून गावातील हा प्रकार आता केवळ एका नाल्याचा प्रश्न राहिलेला नसून प्रशासन, पर्यावरण, शेतकरी सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा मुद्दा बनला आहे. आता संबंधित विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण खालापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Social Plugin