Type Here to Get Search Results !

“झुरळ” वक्तव्यावरून देशभरात डिजिटल वादळ

* मराठी तरुणाच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम

* सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात तरुणांचा उपहासात्मक बंड

* छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दीपकेची भन्नाट कल्पना देशभर चर्चेत

जळगांव / प्रतिनिधी :- देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात सोशल मीडियावर मोठे वादळ निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने स्थापन केलेली “कॉकरोच जनता पार्टी” (CJP) सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. बेरोजगार तरुणांना “झुरळांप्रमाणे व्यवस्थेत घुसखोरी करणारे” असे संबोधल्याचा आरोप होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यातूनच या उपहासात्मक पक्षाचा जन्म झाला.

अवघ्या काही दिवसांत या पक्षाने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत लाखो-कोट्यवधी तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत या पक्षाने काही राष्ट्रीय पक्षांनाही मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे.


* कोण आहे अभिजीत दीपके ? :- “कॉकरोच जनता पार्टी”ची स्थापना करणारा अभिजीत दीपक दीपके हा छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय तरुण असून तो व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार (Political Communication Strategist) म्हणून कार्यरत आहे. अभिजीतने पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्याने Public Relations विषयात Master of Science (MS) पूर्ण केले आहे. राजकीय आणि सोशल मीडिया मोहिमा व्हायरल करण्याचा त्याला मोठा अनुभव असल्याचे सांगितले जाते.


* “आप”च्या सोशल मीडिया टीममध्ये केले काम :- अभिजीत दीपकेने 2020 ते 2023 या काळात आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक मीम्स आणि डिजिटल मोहिमांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. त्याने दिल्ली शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणूनही काम केले होते.


* नेमके काय होते “झुरळ” वक्तव्य ? :- 15 मे 2026 रोजी बनावट पदव्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय यंत्रणेत घुसखोरी करीत असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला.


या वक्तव्यानंतर देशभरातील बेरोजगार तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. विशेषतः NEET पेपरफुटी, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार आणि वाढत्या मानसिक तणावामुळे त्रस्त असलेल्या तरुणांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.


नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत हे वक्तव्य सामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसून बनावट पदव्यांच्या आधारे व्यवस्थेत शिरणाऱ्यांसाठी होते, असे म्हटले. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी”ची लाट सुरू झाली होती.


* जर सगळी झुरळं एकत्र आली तर ? आणि जन्म झाला CJP चा :- अभिजीत दीपकेने 16 मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर गंमतीने पोस्ट करीत विचारले, “जर सगळी झुरळं एकत्र आली तर काय होईल?” याच पोस्टनंतर त्याने “Cockroach Janata Party” नावाची वेबसाइट आणि Google Form सुरू केला. काही तासांतच हजारो तरुणांनी सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. 


* पक्षाचे सदस्यत्व मिळविण्यासाठी चार भन्नाट अटी :- कॉकरोच जनता पार्टीने सदस्यत्वासाठी चार वेगळ्या अटी जाहीर केल्या आहेत. त्यात बेरोजगार असणे, आळशी किंवा निष्क्रिय असणे, 24 तास ऑनलाईन राहण्याचे व्यसन असणे, व्यावसायिक पद्धतीने तक्रार करण्याची क्षमता असणे या उपरोधिक आणि विनोदी शैलीमुळे तरुणांमध्ये पक्षाची लोकप्रियता झपाट्याने वाढली.


* सोशल मीडियावर अक्षरशः स्फोट :- “कॉकरोच जनता पार्टी”च्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळाले. काही वृत्तांनुसार, इन्स्टाग्रामवर पक्षाचे फॉलोअर्स 10.5 मिलियनपर्यंत पोहोचले असल्याचा दावा करण्यात आला आहे.


आज (21 मे) गुरुवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत, इन्स्टाग्रामवर हा आकडा 10.5 मिलियनआणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत पोहोचला होता. इन्स्टाग्रामवर भाजपचे 8.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे 13.3 मिलियन आहेत. जितक्या वेगाने कॉकरोच जनता पार्टीला प्रतिसाद मिळत आहे तो पाहता तो देशातील अशांत तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा रंगली आहे. 


* धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी… आणि आळशी :- पक्षाचे घोषवाक्यही तितकेच हटके आहे. "धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी” यामुळे सोशल मीडियावर मीम्स, व्हिडिओ, व्यंगचित्रे आणि चर्चांचा अक्षरशः पूर आला आहे.


* CJP चा जाहीरनामाही व्हायरल :- कॉकरोच जनता पार्टीने आपला “जाहीरनामा” देखील प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये काही उपहासात्मक पण चर्चेत आलेल्या मागण्या आहेत. सीजेपी (झुरळ जनता पार्टी) सत्तेवर आली, तर कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही. जर कोणतेही वैध मत रद्द केले गेले, तर मुख्य निवडणूक आयुक्तांना यूएपीए (UAPA) अंतर्गत अटक केली जाईल, कारण कोणाचा मतदानाचा हक्क काढून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नाही. महिलांसाठी 33 नव्हे, तर 50 टक्के आरक्षण असेल. यासाठी खासदारांची संख्या वाढवली जाणार नाही. मंत्रिमंडळातही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असेल. खऱ्या अर्थाने स्वतंत्र माध्यमांना भरभराटीस येण्याची संधी देण्यासाठी अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. लाळघोटू मीडिया अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. जर कोणताही आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेला, तर त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. त्यांना पुढील 20 वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल. या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.


* महुआ मोईत्रा, कीर्ती आझाद यांचाही पाठिंबा :- तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या काही विरोधी पक्षातील नेत्यांनीही सोशल मीडियावर या मोहिमेचे समर्थन केले.


* बेरोजगारी, पेपरफुटी आणि मानसिक तणावाचा उद्रेक ? :- राजकीय विश्लेषकांच्या मते, “कॉकरोच जनता पार्टी” हा फक्त विनोद किंवा सोशल मीडिया ट्रेंड नसून देशातील तरुणांच्या मनातील अस्वस्थता, बेरोजगारी, पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि व्यवस्थेविरोधातील संतापाचे प्रतीक बनत आहे. अनेक तरुणांनी “आमचा आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आम्ही व्यंगातून बोलतोय,” अशी भावना व्यक्त केली आहे.


* देशभरात चर्चेचा विषय :- एकीकडे काही जण या मोहिमेला केवळ “डिजिटल व्यंग” मानत आहेत, तर दुसरीकडे अनेकांच्या मते हा देशातील तरुणांचा व्यवस्थेविरोधातील डिजिटल आंदोलनाचा नवा चेहरा ठरत आहे. आता “कॉकरोच जनता पार्टी” ही केवळ सोशल मीडिया मजा राहते की पुढे प्रत्यक्ष सामाजिक-राजकीय चळवळीत रूपांतरित होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


* सरन्यायाधीशांचे 'झुरळ' वक्तव्यावर स्पष्टीकरण :- दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या 'परजीवी' आणि 'झुरळ' या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझे वक्तव्य विशेषतः अशा लोकांसाठी होते, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे कायद्यासारख्या व्यवसायात शिरले आहेत. अशा लोकांनी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. ते परजीवींसारखे आहेत." एका खटल्याची सुनावणी करतांना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले, "काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, जे नंतर प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात."

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement