* 75 लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे भाजपाचे उद्दिष्ट
* वैचारिक अधिष्ठान, सोशल मीडिया, सरकारच्या उपलब्धींवर मार्गदर्शन
कर्जत / राजेंद्र जाधव :- भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग नुकताच कर्जत येथील नक्षत्र फार्म येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
भारतीय जनता पक्षाने देशभरातील सुमारे 75 लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर रायगड जिल्ह्यातील 17 मंडलांमध्ये मंडलस्तरीय प्रशिक्षण वर्ग यापूर्वी पार पडले आहेत. त्यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांसाठी हा विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. आगामी काळात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींसाठीही प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रशिक्षण वर्गात वैचारिक अधिष्ठान, केंद्र व राज्य सरकारची उपलब्धी, कार्यकर्त्यांचा सन्मान, देशासमोरील आव्हाने, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, भाजपाचा इतिहास आणि विचार परिवार अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते माधवराव भंडारी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे, विचारवंत भरत आमदापुरे, प्रदेश प्रवक्ते गणेश खणकर आणि आयटी सेलचे समीर गुरव यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
शिबिराचे उद्घाटन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले, तर समारोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गांस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Social Plugin