Type Here to Get Search Results !

राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

* 16 जागांसाठी मतदानाची घोषणा : जळगाव, पुणे, ठाणे, नाशिकसह महत्त्वाच्या मतदारसंघात रंगणार राजकीय लढत

* 18 जून रोजी मतदान, 22 जूनला मतमोजणी ; पावसाळी अधिवेशनापूर्वी बदलणार राजकीय समीकरणे?

मुंबई / प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही वेग आला आहे. विशेष म्हणजे, या 16 जागांसोबतच एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे. त्यामुळे आगामी काळात विधान परिषदेतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

* दोन-अडीच वर्षांनंतर रिक्त जागांवर निवडणूक :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे संबंधित विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या आणि विधान परिषदेचे संख्याबळ कमी झाले होते. मात्र, नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता संबंधित मतदारसंघांमध्ये आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाली आहे. नियमानुसार, एखाद्या मतदारसंघातील किमान 75 टक्के सदस्य उपलब्ध असल्यास निवडणूक घेता येते. ही अट पूर्ण झाल्याने निवडणूक आयोगाने अखेर निवडणुकीची घोषणा केली.


* महसूल मंत्र्यांच्या जागेसाठीही पोटनिवडणूक :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 


* विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. या निवडणुकीत महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होणार असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.


* कोणत्या जिल्ह्यांवर राज्याचे लक्ष ? :- या निवडणुकीत पुणे, ठाणे, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर - जालना, रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग, सांगली - सातारा, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली, धाराशिव - लातूर - बीड आणि परभणी - हिंगोली या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि धक्कातंत्र यामुळे या निवडणुका अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


* असा असेल निवडणूक कार्यक्रम :-

अधिसूचना जारी - 25 मे 2026

- नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 1 जून 2026

- अर्ज छाननी - 2 जून 2026

- अर्ज माघारीची अंतिम तारीख - 4 जून 2026

- मतदान - 18 जून 2026

- मतदानाची वेळ - सकाळी 8 ते दुपारी 4

- मतमोजणी - 22 जून 2026

- निवडणूक प्रक्रिया पूर्ण - 25 जून 2026


* कोणत्या मतदारसंघात होणार मतदान :- सोलापूर प्रशांत परिचारक, अहिल्यानगर अरुणकाका जगताप, ठाणे रविंद्र फाटक, जळगाव चंदूभाई पटेल, सांगली - सातारा मोहनराव कदम, नांदेड अमरनाथ राजूरकर, यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी, पुणे अनिल भोसले, भंडारा - गोंदिया डॉं. परिणय फुके, रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे, नाशिक नरेंद्र दराडे, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली रामदास आंबटकर, अमरावती प्रवीण पोटे, धाराशिव - लातूर - बीड सुरेश धस, परभणी - हिंगोली, विप्लव बाजोरिया, छत्रपती संभाजीनगर - जालना अंबादास दानवे.


* पावसाळी अधिवेशनापूर्वी राजकीय रंगत वाढणार :- या निवडणुकीचा थेट परिणाम विधान परिषदेतील संख्याबळावर होणार असल्याने महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलत असल्याने अपक्ष आणि नाराज नेत्यांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement