Type Here to Get Search Results !

भाजपकडून अब्दुल रज्जाक शेख यांना अल्पसंख्यांक आघाडीची जबाबदारी देण्याची मागणी जोरात

* माजी आमदार दिलीप वाघ यांचे कट्टर समर्थक

* पाचोरा-भडगांव तालुक्यात मोठा जनसंपर्क

* पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भावना

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- भाजप नेते माजी आमदार दिलीप वाघ यांचे कट्टर समर्थक आणि नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अब्दुल रज्जाक शेख यांना भारतीय जनता पार्टीकडून पाचोरा-भडगांव विधानसभा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्ते आणि अल्पसंख्यांक समाजातील युवकांकडून जोर धरू लागली आहे.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अब्दुल रज्जाक शेख यांचा मोठा जनसंपर्क असून सामाजिक, राजकीय आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरदेवळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्यास पक्षाला निश्चितच मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


विशेषतः नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटात भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर यांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळू शकते, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. अल्पसंख्यांक समाजात अब्दुल रज्जाक शेख यांचा प्रभाव आणि संपर्क लक्षात घेता भाजपच्या विस्तारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशी भावना व्यक्त होत आहे.


अब्दुल रज्जाक शेख हे ग्रामपंचायत सदस्य असतांना त्यांनी वॉर्ड क्रमांक 3 मध्ये विविध विकासकामे राबविली होती. रस्ते, वीज, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे सध्या कोणतेही पद नसतांनाही ते महावितरण विभागाच्या माध्यमातून गावातील वीज समस्यांवर सक्रियपणे काम करीत असल्याचे नागरिक सांगतात.


वीजेचा वाढता भार कमी करण्यासाठी स्वतंत्र डीपी बसविणे, नवीन वीज खांब उभारणे, अंधारमुक्त गावासाठी प्रयत्न करणे यासह अनेक विषयांवर ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. नगरदेवळा-घुसर्डी रस्त्यांवरील गडद नदीवरील पूल, टाकळी रस्ता, बाजारपेठेतील लाईट व्यवस्था तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्यांबाबतही त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक गणित लक्षात घेऊन अब्दुल रज्जाक शेख यांना पाचोरा-भडगाव विधानसभा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी आता उघडपणे पुढे येत आहे.


दरम्यान, पक्षश्रेष्ठी या मागणीवर काय निर्णय घेतात आणि भाजपच्या आगामी संघटनात्मक बदलांमध्ये अब्दुल रज्जाक शेख यांना संधी मिळते का ? याकडे पाचोरा-भडगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement