* जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा विश्वासू शिलेदार, कार्यकर्त्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
जळगाव जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सक्रिय राहून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, अर्थात सर्वांच्या परिचयाचे “जिभू”. साधी राहणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, जनसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि शिवसेनेच्या विचारांशी असलेली निष्ठा यामुळे त्यांनी जिल्ह्यात एक प्रभावी नेतृत्व म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावोगावी फिरत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेते म्हणून काम करतांना स्थानिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. ग्रामीण भागातील विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना दिशा देणारे उपक्रम आणि सामाजिक समन्वय राखण्याच्या भूमिकेमुळे त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत गेला.
राजकारणात केवळ पदासाठी नव्हे तर माणसांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक कार्यकर्त्यांसाठी ते केवळ नेते नसून आधारवड ठरले आहेत. एखाद्या कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात धावून जाणे, अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत करणे आणि पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी सातत्याने मेहनत घेणे, ही त्यांची कार्यशैली आजही कायम आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला आहे.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणे, संघटन टिकवून ठेवणे आणि पक्षाच्या विचारसरणीशी बांधिलकी जपणे हे त्यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये “जिभू” हे नाव आपुलकीने घेतले जाते, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरदेवळा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य जाहीर कीर्तन सोहळा हा त्यांच्या लोकप्रियतेचाच प्रत्यय होता. आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती, हजारो शिवसैनिकांचा उत्साह आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या समाजप्रबोधनात्मक किर्तनातून धार्मिक व सामाजिक वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमानंतर केक कापून, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि गुलाब फुलांचा भव्य हार घालून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या राजकारणात कार्यकर्त्यांशी नाळ जपणारे नेतृत्व दुर्मिळ होत चालले असतांना रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्व आगामी काळातही समाज, शिवसेना पक्ष आणि जनतेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
शब्दांकन - हसीबूर शेख


Social Plugin