* कोट्यवधींच्या वाहनांचा वापरच नाही : शहर स्वच्छतेसाठी आणलेल्या दोन महागड्या गाड्या निष्क्रिय
* पाच कोटींचा खर्च, पण रस्ते मात्र अस्वच्छच - नागरिकांचा सवाल
उल्हासनगर / सलीम मन्सूरी :- उल्हासनगर शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेकडून खरेदी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दोन अत्याधुनिक स्वच्छता गाड्या सध्या धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या अपेक्षेने या गाड्या आणण्यात आल्या होत्या, मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्या वापराविना उभ्याच असल्याने महापालिकेच्या वाहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रस्त्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी महापालिकेने प्रत्येकी सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या दोन स्वच्छता गाड्या खरेदी केल्या आहेत. म्हणजेच जवळपास पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र या दोन्ही गाड्या महापालिकेच्या पाठीमागील परिसरात उभ्या असून त्यांच्यावर धुळ साचलेली दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, या परिसरात काही रुग्णवाहिका तसेच इतर वाहनेही निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या वाहन व्यवस्थापनावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्ते अस्वच्छ असून कचरा, धुळ आणि घाणीची समस्या गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत स्वच्छतेसाठी आणलेल्या अत्याधुनिक गाड्यांचा वापर का केला जात नाही ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून वाहने आणायची आणि नंतर ती वापराविना उभी ठेवायची, हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही का ? अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून निष्क्रिय अवस्थेत उभ्या असलेल्या या गाड्या योग्य देखभालीअभावी भविष्यात भंगारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत उन्हात आणि पावसात उभ्या राहिल्यामुळे वाहनांवर गंज चढण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. या संदर्भात महापालिकेच्या वाहन विभागाचे प्रमुख विनोद केणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.
शहरातील स्वच्छतेसाठी आणलेल्या कोट्यवधींच्या वाहनांचा वापर तातडीने सुरू करावा आणि संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Social Plugin