Type Here to Get Search Results !

कान तुटलेला ‘बहिरा’ पूल आणि मुकं प्रशासन!

* गडद नदीवरील पुलाचे कठडे तुटल्याने अपघाताचा धोका

* 20 ते 25 हजार लोकसंख्येच्या नगरदेवळा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

* पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील मोठ्या आणि महत्त्वाच्या गावांपैकी एक असलेल्या नगरदेवळा येथील गडद नदीवरील पूल आज अत्यंत धोकादायक अवस्थेत उभा असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून पडले असून हा पूल जणू "कान तुटलेला बहिरा पूल" बनला आहे. ग्रामस्थांच्या वारंवार मागण्या, तक्रारी आणि चिंता असूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नगरदेवळा हे सुमारे 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव असून गावातील नागरिकांना रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी गडद नदीवरील हाच मुख्य मार्ग वापरावा लागतो. नगरदेवळा ते नगरदेवळा रेल्वे स्टेशन हे सुमारे चार किलोमीटर अंतर असून दररोज शेकडो नागरिक रिक्षा, दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांद्वारे या पुलावरून प्रवास करतात. त्यामुळे हा मार्ग दिवस-रात्र अक्षरशः धावत असतो.


मात्र पुलावरील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा धोका अधिक गंभीर स्वरूप धारण करतो. नदीला पूर आल्यानंतर पुलालगतच्या परिसरात वाहनांचे संतुलन बिघडल्यास थेट नदीत कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षा चालक यांच्यात या पुलाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


ग्रामस्थांच्या मते, पुलाचे "कान" तुटले असले तरी खरे तर प्रशासनाचेच कान बंद झाले आहेत. विकासाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच दुरुस्तीची कामे सुरू होणार का ? अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.


नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत लोखंडी कठडे बसविण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि धोक्याचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.


आज प्रश्न फक्त एका पुलाचा नाही, तर हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा आहे. अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी भावना नगरदेवळा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


पावसाळा तोंडावर आला असतांना गडद नदीवरील या धोकादायक पुलाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याकडे आता संपूर्ण नगरदेवळा परिसराचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement