* मशिदीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त
* नमाजासाठी मुस्लिम बांधवांची उपस्थिती
* बंधुभाव, त्याग आणि सामाजिक ऐक्याचा संदेश
खोपोली / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात गुरुवार, 28 मे 2026 रोजी मुस्लिम बांधवांनी बकरा ईद अर्थात ईद-उल-अजहा मोठ्या धार्मिक उत्साहात, श्रद्धेने आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली. पहाटेपासूनच तालुक्यातील विविध मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. “अल्लाहू अकबर”च्या घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करून सणाचा आनंद साजरा केला. विविध भागांत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर आदराचे दर्शन घडले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खालापूर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. मशिद परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून संपूर्ण सण शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडला.
मुस्लिम समाजात रमजान ईद आणि बकरा ईद या दोन प्रमुख सणांना विशेष महत्त्व आहे. रमजान ईदनंतर सुमारे सत्तर दिवसांनी बकरा ईद साजरी केली जाते. ईद-उल-अजहा किंवा ईद-उल-जुहा म्हणून ओळखला जाणारा हा सण त्याग, श्रद्धा आणि अल्लाहप्रती समर्पणाचे प्रतीक मानला जातो.
इस्लाम धर्मातील मान्यतेनुसार पैगंबर हजरत इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशाप्रती असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी मोठा त्याग करण्याची तयारी दर्शविली होती. त्याच स्मरणार्थ कुर्बानीची परंपरा सुरू झाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे या सणाला "त्यागाची ईद" असेही संबोधले जाते.
बकरा ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव नमाज अदा करून इस्लामिक परंपरेनुसार कुर्बानीची धार्मिक प्रथा पार पाडतात. विशेष म्हणजे कुर्बानीसाठी घेतलेला प्राणी हा प्रामाणिक आणि कष्टाच्या कमाईतून घेतलेला असावा, अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे. या सणातून दानशूरता, प्रामाणिकपणा, गरजूंना मदत करण्याची भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
खालापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी धार्मिक परंपरा जपत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत बकरा ईद साजरी केली. शांतता, बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सौहार्दाचा संदेश देत हा सण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.


Social Plugin