* दहावीत 80 टक्के गुण मिळवत कासिम कमरुद्दीन शेखची भरारी
* परिस्थिती कठीण असली तरी शिक्षण थांबवायचे नाही - कासिम कमरुद्दीन शेख
नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करीत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले असून त्यामध्ये कासिम कमरुद्दीन शेख याची विशेष चर्चा होत आहे. दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळविणाऱ्या कासिमने संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण घेत आपल्या जिद्दीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडील मुंबई येथे रिक्षा चालक म्हणून काम करतात, तर कासिम स्वतःही शिक्षणासाठी गवंडी कामावर जाऊन कुटुंबाला हातभार लावत आहे.
* परिस्थितीशी दोन हात करीत मिळवले यश :- कासिमचे वडील कमरूद्दीन अमिरूद्दीन शेख हे मुंबई येथे रिक्षा चालक आहेत. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना दिवसरात्रं मेहनत करावी लागते. कासिमची बहीण आफरीन बानो ही पदवीधर असून तिचा विवाह झाला आहे. घरातील परिस्थितीमुळे कासिमलाही लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली. शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तो मिस्तरी आणि गवंडी कामावरही जात असल्याची माहिती समोर आली आहे.
* शांत स्वभाव, पण मोठे स्वप्न :- कासिम हा स्वभावाने अतिशय शांत आणि लाजराबुजरा आहे. तो फारसा कुणाशी बोलत नाही. मात्र, त्याच्या शांततेत भविष्याचे मोठे नियोजन दडलेले आहे. दैनिक कोकण प्रदेश न्यूजशी बोलताना कासिमने सांगितले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण सोडायचे नाही, हे मी ठरवले होते. शाळेत शिक्षक जे शिकवत होते ते लक्षपूर्वक ऐकत होतो. घरी जाऊन Revision करीत होतो. वेळ मिळेल तसा अभ्यास केला.
तो पुढे म्हणाला, काम आणि अभ्यास यांचा समतोल राखणे थोडे कठीण होते. पण आई-वडिलांचे कष्ट पाहून मला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली.
* बीएससी फार्मसी करून मेडिकल क्षेत्रात करिअरचे स्वप्न :- कासिमला पुढे शिक्षण घेऊन बीएससी फार्मसी करण्याची इच्छा आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर घडवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे त्याचे स्वप्न आहे. मला पुढे फार्मसी क्षेत्रात जायचे आहे. शिक्षणाच्या जोरावर चांगले करिअर करून आई-वडिलांची परिस्थिती बदलायची आहे, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
* शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे :- कासिमने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई-वडिलांना दिले. आमच्या शाळेतील शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. काही समजले नाही तर पुन्हा समजावून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला अभ्यासात आत्मविश्वास मिळाला, असे कासिम म्हणाला.
* संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांचा प्रेरणादायी प्रवास :- आज सर्वच क्षेत्रात मुलींचे यश कौतुकास्पद आहे; मात्र त्याचवेळी संघर्षातून पुढे येत मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कासिमसारख्या विद्यार्थ्यांचाही समाजाला अभिमान वाटत आहे. काम करीत शिक्षण पूर्ण करणे, शांतपणे मेहनत घेणे आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवणे यामुळे कासिम अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
'दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवत संघर्षमय परिस्थितीतून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कासिम कमरुद्दीन शेख याला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्याची मेहनत, शांत स्वभाव, जिद्द आणि मेडिकल क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होवो, तसेच त्याचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.
* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.


Social Plugin