Type Here to Get Search Results !

गवंडी कारागीराच्या मुलीचे दहावीत यश

* हलीमा शेख नुरूल्ला हिला 60.60 टक्के गुण

* मेहनत, सातत्य आणि मैत्रिण मुबश्शरा व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच यश 

गरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करीत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यामध्ये हलीमा शेख नुरूल्ला हिचा विशेष उल्लेख होत आहे.

गवंडी मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नुरूल्ला शेख मुनाफ यांची कन्या हलीमा शेख नुरूल्ला हिने दहावीच्या परीक्षेत 60.60 टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाचे आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. संघर्षमय परिस्थितीतून अभ्यास करीत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

* मेहनती कुटुंबातील जिद्दी विद्यार्थिनी :- हलीमाचे वडील नुरूल्ला शेख हे गवंडी मिस्तरी म्हणून काम करतात. कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला आहे. घरातील चार भाऊ आपापल्या क्षेत्रात मेहनत घेत आहेत. असद अहमद व कासिम अहमद सेटिंग कारागीर आहेत तर हयात याचा गॅरेज व्यवसाय व रहमत बारावीत शिक्षण घेत आहे. अशा मेहनती वातावरणात वाढलेल्या हलीमाला शिक्षणाचे महत्त्व लहानपणापासूनच समजले.


* दहावी ही आयुष्याला दिशा देणारी परीक्षा :- दैनिक कोकण प्रदेश न्यूजशी संवाद साधताना हलीमाने आपल्या यशाबाबत मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली की, दहावीची परीक्षा खूप महत्त्वाची असते. वर्षभर नियमित अभ्यास केला तर चांगले गुण मिळवता येतात. शाळेत शिक्षक जे शिकवतात ते लक्ष देऊन समजून घेतले पाहिजे आणि घरी आल्यावर Revision केले पाहिजे.


ती पुढे म्हणाली, कुठलाही विषय अवघड वाटला तरी घाबरायचे नाही. शिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजेत. मेहनत आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळते.


* शिक्षिका बनण्याचे स्वप्न :- हलीमाचे भविष्यात शिक्षिका बनण्याचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात चांगले काम करण्याची तिची इच्छा आहे. मला पुढे खूप शिकायचे आहे. शिक्षिका बनून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करायचे आहे, असे ती आत्मविश्वासाने सांगते. तिच्या बोलण्यातून शिक्षणाबद्दलची गंभीरता आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द स्पष्ट दिसून येत होती.


* मैत्रिण मुबश्शरा व शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे :- हलीमाने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई-वडिलांना दिले. तसेच तीची मैत्रिण मुबश्शरा अ. सादीक शेख हिने खूप मार्गदर्शन केले. मदत केली व प्रोत्साहन दिले असे ही ती म्हणाली. आमच्या शाळेतील शिक्षक खूप प्रेमाने शिकवतात. काही समजले नाही तर पुन्हा समजावून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला अभ्यासात आत्मविश्वास मिळाला, असे ती म्हणाली.


* संघर्षातून उभे राहिलेले प्रेरणादायी यश :- कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या जोरावर पुढे जाता येते, हे हलीमाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

'दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत 60.60 टक्के गुण मिळवत संघर्षमय परिस्थितीतून उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या हलीमा शेख नुरूल्ला हिला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तिची मेहनत, जिद्द, सकारात्मक विचार आणि शिक्षिका बनण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होवो, तसेच तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.

* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement