* पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
खोपोली / प्रतिनिधी :- वासरंग गाव ते खोपोली नगर परिषद हद्दीला जोडणारा नदीवरील पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पुलावरील लोखंडी कठडे गंजून अनेक ठिकाणी कोसळले असून काही भागांमध्ये कठड्यांचे नामोनिशाणही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पुलावर प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि पाण्याचा वेगही प्रचंड असतो. अशा परिस्थितीत पुलाला संरक्षण कठडे नसल्यामुळे एखादे वाहन घसरून किंवा चालकाचा तोल जाऊन थेट नदीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पुलाची पाहणी करून दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी केली आहे. तसेच कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पुलावर तात्पुरते बॅरिकेड्स, इशारा फलक आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खोपोली नगर परिषद आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.


Social Plugin