* पहिली मराठी हिप-हॉप म्युझिकल फिल्म ‘येतो का नाय’ची घोषणा
* KGF, Kantara आणि Salaar चे निर्माते आता मराठी हिप-हॉपच्या दुनियेत
* मुंबईच्या पार्श्वभूमीवर उलगडणार युवांच्या स्वप्नांचा, मैत्रीचा आणि ओळखीचा प्रवास
मुंबई / फिरोज पिंजारी :- भारतीय चित्रपटसृष्टीला ‘KGF’, ‘Kantara’ आणि ‘Salaar’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या प्रसिद्ध होम्बळे फिल्म्सने मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठे सरप्राईज जाहीर केले आहे. प्रॉडक्शन हाऊसने आपल्या पहिल्या मराठी हिप-हॉप म्युझिकल चित्रपट ‘येतो का नाय’ (YETO KA NAAY) ची अधिकृत घोषणा केली असून, या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘YKN - पहिला वार’ या नावाने प्रदर्शित केली जाणार आहे.
मराठी हिप-हॉप संस्कृती, युवांच्या भावना, संघर्ष, मैत्री, प्रेम आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासावर आधारित हा चित्रपट मराठी सिनेमासाठी एक नवा प्रयोग मानला जात आहे. मुंबईच्या गजबजलेल्या आणि स्वप्नांना आकार देणाऱ्या वातावरणात ही कथा घडणार असून, आधुनिक युवकांच्या आयुष्याचे वास्तववादी चित्रण या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
* मराठी हिप-हॉप संस्कृतीला मोठ्या पडद्यावर स्थान :- गेल्या काही वर्षांत मराठी रॅप आणि हिप-हॉप संगीताने तरुणांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच सांस्कृतिक लाटेला केंद्रस्थानी ठेवत ‘येतो का नाय’ हा चित्रपट साकारला जात आहे. मराठी भाषेतील हा पहिलाच मोठ्या प्रमाणावरचा हिप-हॉप म्युझिकल प्रोजेक्ट असल्याने चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
* दिग्दर्शनाची धुरा सारंग संजीव साठे यांच्याकडे :- या चित्रपटाचे निर्माते विजय किरगंदूर असून दिग्दर्शनाची जबाबदारी सारंग संजीव साठे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा सारंग संजीव साठे, सुजॉय जाधव, सृष्टी तावडे आणि श्रेयस सगवेकर यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. तर छायांकनाची जबाबदारी हर्षवीर ओबेरॉय यांनी सांभाळली असून संगीताची धुरा एवी प्रफुल्लचंद्र यांच्याकडे आहे. संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत हा विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
* मुंबईत सुरू शूटिंग, याच वर्षी होणार प्रदर्शित :- निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. शहरातील वास्तववादी लोकेशन्स, हिप-हॉप संस्कृतीचे वातावरण आणि युवकांच्या जीवनशैलीचे चित्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘येतो का नाय’ हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
* होम्बळे फिल्म्सचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प :- होम्बळे फिल्म्सने गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘KGF: Chapter 1’, ‘KGF: Chapter 2’, ‘Kantara’, ‘Salaar : Part 1 - Ceasefire’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे त्यांनी देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तसेच ‘महावतार नरसिंह’ सारख्या ऍनिमेशन चित्रपटाद्वारे भारतीय संस्कृती आणि पौराणिक वारसा नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे कामही त्यांनी केले आहे. आता मराठी हिप-हॉप संस्कृतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या दिशेने ‘येतो का नाय’ हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मानले जात आहे.
* युवकांच्या भावविश्वाला मिळणार नवा आवाज :- मैत्री, प्रेम, संघर्ष, महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची धडधड या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. आधुनिक संगीत, दमदार कथा आणि नव्या पिढीच्या भाषेत मांडलेले वास्तव यामुळे ‘येतो का नाय’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठी सिनेमाला नव्या उंचीवर नेणाऱ्या या प्रकल्पाकडे आता संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


Social Plugin