Type Here to Get Search Results !

विषारी दारू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन

* पुणे-पिंपरी चिंचवडमधील मृत्यूंसाठी प्रशासन जबाबदार ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

* सत्ताधारी भाजप नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन निष्क्रिय - सुनील गव्हाणे

पिंपरी चिंचवड / प्रतिनिधी :- पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूचे सेवन केल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने दापोडी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शहरातील अवैध मद्यविक्री आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.


यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अशा प्रकारच्या घटना घडणे ही प्रशासनाच्या अपयशाची पावती आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची शंका निर्माण होत आहे. प्रशासनावर दबाव आणून हे प्रकार राजरोसपणे सुरू ठेवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे, असे सांगितले.


तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांनी, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी आणि अशा दुर्दैवी घटनांमुळे गृहमंत्रालय अपयशी ठरले असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारावी, असे मत व्यक्त केले.


युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी विषारी दारूमुळे झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पूर्वी बिहार किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये ऐकायला मिळत होत्या. मात्र आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या प्रगत शहरांमध्ये अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे म्हटले.


कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी, महागाईच्या काळात कुटुंबप्रमुखाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. या घटनेसाठी शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली.


महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी, स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला या घटनेमुळे गालबोट लागले आहे. विषारी दारूमुळे कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट कोसळले असून यासाठी प्रशासन जबाबदार आहे, असे सांगितले.


सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत अवैध दारू विक्रीचे अड्डे सुरू होते. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन न करता त्यांची सखोल चौकशी करावी. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव, कल्पनाताई घाडगे, युवक विधानसभा अध्यक्ष ॲंड. संतोष शिंदे, सरचिटणीस रजनीकांत गायकवाड, वसीम पठाण, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष रिषभ भाडाळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आप्पा गायकवाड, नाभिक समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू वाळुंजकर, दीपक साळवी, बबलू चखाले, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मेहबूब शेख, भाऊसाहेब मुकुटमल, सुहास देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


निषेध आंदोलनादरम्यान दोषींवर कठोर कारवाई, अवैध दारू विक्री अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी आणि मृतांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement