* एमएसआरडीसीचा भोंगळ कारभार पुन्हा उघड!
* पाली फाटा आणि एक्सप्रेसवे पुलाखाली गुडघाभर पाणी ; नागरिक, वाहनचालक संतप्त
* नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च कुठे गेला ? प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
खोपोली / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यात झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने प्रशासनाच्या तयारीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. सावरोली गाव हद्दीतील मुंबई - पुणे एक्सप्रेसवेच्या पुलाखाली तसेच पाली फाट्याच्या पुलाखालचा परिसर काही मिनिटांतच जलमय झाल्याने नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून एमएसआरडीसीच्या निष्क्रिय आणि नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटार दुरुस्ती, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे दावे प्रशासनाकडून केले जातात. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच मुसळधार पावसात पुलाखाली तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने “कामे कागदावरच झाली का ?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
खालापूर - पेण मार्गांवरील एक्सप्रेसवे पुलाखाली आणि पाली फाट्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक अडकून पडले. काही वाहने पाण्यात बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेषतः रात्रीच्या वेळी पुलाखालील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अपघाताचा धोका अधिक वाढणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी एमएसआरडीसी आणि संबंधित विभागांवर तीव्र टीका करतांना सांगितले की, दरवर्षी पावसाळ्याआधी नालेसफाई झाल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात नाले तुंबलेलेच असतात. पहिल्याच पावसात रस्ते जलमय होतात. मग कोट्यवधी रुपयांचा निधी जातो कुठे ? नागरिकांच्या मते, पुलाखालच्या भागात कायमस्वरूपी पाणी निचरा व्यवस्था उभारण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना न केल्याने सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
एक्सप्रेसवे लगत आणि पाली फाट्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पावसात एखादे वाहन पाण्यात अडकणे, विजेचा धोका किंवा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सवाल केला आहे की, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली होती का ? पाणी निचऱ्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा का उभारली नाही ? पुलाखालील भागाची नियमित पाहणी होते का ? नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
अचानक झालेल्या वादळी पावसामुळे परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना अंधार आणि पाण्याचा दुहेरी त्रास सहन करावा लागला.
स्थानिकांनी प्रशासनाकडे पुलाखाली साचलेले पाणी त्वरित काढावे, नाले व गटारे युद्धपातळीवर साफ करावीत, पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पावसाळ्यात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.
पहिल्याच पावसात एक्सप्रेसवे आणि पाली फाट्याखाली निर्माण झालेल्या जलमय परिस्थितीमुळे एमएसआरडीसी प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. जर पहिल्याच पावसात ही अवस्था असेल, तर मुसळधार पावसात काय होणार ? असा प्रश्न आता खालापूर तालुक्यातील नागरिक विचारू लागले आहेत.


Social Plugin