* परिस्थितीची जाणीव ठेवत साबेरा शेख अमान हिने मिळवले 77.60 टक्के गुण
* मेहनत, सातत्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच यशाचे सूत्र - साबेरा शेख अमान
नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करीत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विशेषतः उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विद्यालयाचा लौकिक अधिक उंचावला आहे. याच यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये साबेरा शेख अमान हिने 77.60 टक्के गुण मिळवत आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेरणादायी यश संपादन केले आहे. केळी कटींगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत तिने अभ्यासात सातत्य ठेवले आणि दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.
* संघर्षमय परिस्थितीतून उभे राहिलेले यश :- साबेराचे वडील शेख अमान हे केळी कटींगचे काम करतात. अत्यंत मेहनतीच्या व्यवसायातून ते कुटुंबाचा सांभाळ करतात. त्यांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले असले, तरी आपल्या मुलींनी शिकून मोठे व्हावे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. साबेराची आईही कुटुंबाला आधार देत मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. घरातील लहान बहीण अलीना शेख अमान ही नुकतीच दुसरी उत्तीर्ण होऊन तिसरीत गेली असून घरात शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येते.
* अभ्यासात सातत्य ठेवा, यश नक्की मिळते :- दैनिक कोकण प्रदेश न्यूजशी संवाद साधताना साबेरा शेख अमान हिने आपल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली की, मी वर्षभर नियमित अभ्यास केला. शाळेत शिक्षक जे शिकवत होते ते लक्षपूर्वक ऐकत असे आणि घरी आल्यावर त्याची Revision करीत होते. मी मुबश्शरा अब्दुल सादिक हिचे मार्गदर्शन घेत असे. रोज थोडा-थोडा अभ्यास केला तर अभ्यासाचा ताण येत नाही.
ती पुढे म्हणाली, दहावीची परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे वेळेचे नियोजन करून अभ्यास केला पाहिजे. ज्या विषयात अडचण येते, त्या विषयाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना प्रश्न विचारायला लाजू नये.
* शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे :- साबेराने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई-वडिलांना दिले. आमच्या शाळेचे वातावरण खूप चांगले आहे. शिक्षक खूप प्रेमाने शिकवतात. कुठलाही विषय समजला नाही तर ते पुन्हा समजावून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला चांगले गुण मिळाले, असे ती म्हणाली.
* मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द :- परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या जोरावर आयुष्यात मोठे यश मिळवता येते, असा विश्वास साबेराच्या बोलण्यातून दिसून येत होता. मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या बळावर भविष्यात चांगले करिअर घडवण्याचे तिचे स्वप्न आहे. तिची संघर्षातून पुढे जाण्याची वृत्ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
'दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत 77.60 टक्के गुण मिळवत कष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या साबेरा शेख अमान हिला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तिचे संघर्षमय आयुष्य, घेतलेले परिश्रम आणि सकारात्मक विचार अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरावेत, हीच सदिच्छा.
* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.



Social Plugin