Type Here to Get Search Results !

टाटा स्टीलजवळ गॅस लिकेजचा संदेश देऊन मॉक ड्रिल

* खालापूरमध्ये आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी

* मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण शिबिर, अवघ्या दहा मिनिटांत यंत्रणा घटनास्थळी दाखल

खालापूर / विशेष प्रतिनिधी :- मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय आणि प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी खालापूर तालुक्यात प्रशिक्षण शिबिर आणि मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानुसार खालापूर तहसीलदार कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षण शिबिरात महसूल विभाग, पोलीस विभाग, अग्निशमन दल, सामाजिक संस्था तसेच नागरिकांना मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


* टाटा स्टील परिसरात गॅस लिकेजचा अलर्ट :- प्रशिक्षणाचा भाग म्हणून दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील टाटा स्टील कंपनी परिसरात गॅस लिकेज झाल्याचा अलर्ट संदेश देण्यात आला. संदेश मिळताच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि जवान अवघ्या दहा मिनिटांत आवश्यक संसाधनांसह टाटा स्टील कंपनीच्या गेट क्रमांक एकजवळ दाखल झाले. या मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तत्परता, समन्वय आणि प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यात आली.


* आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन :- रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल अधिकारी एम. के. म्हात्रे यांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.


यावेळी नोडल अधिकारी एम. के. म्हात्रे आणि श्रीकांत शिरसाठ यांनी मॉक ड्रिलचे महत्त्व स्पष्ट करीत विविध विभागांतील समन्वय हीच आपत्ती व्यवस्थापनातील सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले.


* विविध विभागांचा सक्रिय सहभाग :- या मॉक ड्रिलमध्ये महसूल विभागाचे अधिकारी राम पवार, खोपोली नगर परिषदेचे फायर ऑफिसर मोहन मोरे व अग्निशमन दलाचे जवान, खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार व पोलीस कर्मचारी, टाटा स्टीलचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, स्वामिनी ॲम्बुलन्स सर्विसच्या रुग्णवाहिका तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन आणि नागरिकांची सज्जता अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement