Type Here to Get Search Results !

लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क मार्ग अंधारात

* 21 खांबांवरील दिवे वर्षानुवर्षे बंद : चोरी, लूटमार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

* महापालिका डोळेझाक का करते ? संतप्त रहिवाशांचा सवाल

सांगली / अविनाश मुळीक :- लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्ककडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अंधाराच्या विळख्यात सापडला असून तब्बल 21 वीज खांबांवरील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या परिसरातील शेकडो रहिवाशांना दररोज अंधारातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गांवर आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरी, लूटमार आणि संशयास्पद हालचालींच्या घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः वयोवृद्ध आणि निवृत्त नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.


स्थानिक रहिवासी बांदार साहेब, भुटाले साहेब, पाटील साहेब, शिंदे साहेब, शेख साहेब यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे लाईट बंद आहेत, तरी महापालिका प्रशासन झोपेत आहे का? ज्यांना कामाचे टेंडर दिले, त्यांना जाब का विचारला जात नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, या अंधारामुळे अनेक वेळा रिटायर व्यक्तींना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. महिलांना आणि विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी या मार्गांवरून जातांना भीती वाटते. तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


दरम्यान, तात्काळ स्ट्रीट लाईट बसवून परिसर प्रकाशमय करण्यात यावा, अन्यथा सर्व वयोवृद्ध नागरिक, तरुण आणि रहिवासी मिळून महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी केवळ निवडणुकीपुरते आश्वासने न देता नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित मूलभूत प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement