* मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
* शासकीय कर्तव्य बजावतांना अधिकाऱ्यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत
कोर्लई - मुरूड / राजीव नेवासेकर :- अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथे अवैध माती उत्खनन प्रकरणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत यांच्यावर भरदिवसा झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौल येथील मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत हे 24 मे 2026 रोजी अनधिकृत गौण खनिज वाहतूक आणि अवैध उत्खनन प्रकरणाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काही गावगुंडांनी हल्ला केला. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय अधिकारी कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर हल्ले होणे अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय कर्तव्यावर असतांना मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, अवैध उत्खनन आणि गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल ढोले, उपाध्यक्ष राहुल जाधव, सचिव सानिका घरत, मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर, संजय बिक्कड तसेच ग्राम महसूल अधिकारी आरती म्हात्रे, वृषाली पाटील, संगीता भाटकर, भावना धोदडे, रेश्मा विरकुड, मयूर नाईक, पूजा विरकुड, सोनल गुरव आणि प्रिय दुमते उपस्थित होते.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Social Plugin