Type Here to Get Search Results !

कुत्रे हो...फक्त राजकीय लोकांनाच चावा घ्या ?

* खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

* अँटी-रेबीज इंजेक्शनसाठी तरुणीचे तीन दिवस हेलपाटे

* राजकीय दबावाखाली उपचार होत असल्याचा आरोप

* इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत परस्परविरोधी आकडेवारीमुळे संशय अधिक गडद

खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर अँटी-रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक तरुणीला सलग तीन दिवस आरोग्य केंद्राचे उंबरठे झिजवावे लागले, मात्र तरीही तिला इंजेक्शन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे राजकीय ओळख आणि प्रभाव असलेल्या व्यक्तींना तत्काळ उपचार दिले जात असल्याचा आरोपही या प्रकरणामुळे पुढे आला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातील कुत्र्यांना कुणी तरी सांगायला हवे की, त्यांनी फक्त राजकीय ओळख असलेल्या लोकांनाच चावा घ्यावा, कारण खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त राजकीय ओळख आणि प्रभाव असलेल्या व्यक्तींनाच अँटी-रेबीज इंजेक्शन मिळते.

दरम्यान, संबंधित तरुणीच्या म्हणण्यानुसार, तिला सुरुवातीला इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी डॉंक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत इंजेक्शन देण्यात आले नाही. त्यावेळी "राजकीय प्रभाव असलेल्या रुग्णाला प्राधान्य द्यावे लागते" असे सूचक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे.


त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9.30 वाजता ती पुन्हा आरोग्य केंद्रात दाखल झाली. सुरुवातीला इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगून तिचा केसपेपर तयार करण्यात आला. मात्र, जवळपास दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर अचानक इंजेक्शन संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित तरुणीला उपचाराविना परत जावे लागल्याचे सांगितले जात आहे.


* माझ्यासमोर दुसऱ्या रुग्णाला इंजेक्शन दिले :- या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित तरुणीच्या उपस्थितीतच दुसऱ्या एका रुग्णाला अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध इंजेक्शनचा वापर नेमका कोणत्या निकषांवर केला जातो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


* महिला कर्मचाऱ्यावर दमदाटीचा आरोप :- याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याने उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. "मी इथलीच आहे, बाहेरची नाही," अशा शब्दांत संबंधित कर्मचाऱ्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तरुणीकडून करण्यात आला आहे. तक्रार करण्याचा प्रयत्न होताच दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


* इंजेक्शनच्या आकडेवारीत मोठा विरोधाभास :- या प्रकरणात आरोग्य विभागाने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष उपलब्ध आकडेवारी यामध्ये मोठा विरोधाभास असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य सहाय्यक हनुमान गोवारे यांनी पत्रकारांशी बोलतांना खालापूर तालुक्यासाठी दरमहा केवळ 30 ते 40 अँटी-रेबीज इंजेक्शन्स उपलब्ध होत असल्याची माहिती दिली. मात्र दुसरीकडे एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने 1 मेपासून आजपर्यंत तब्बल 112 रुग्णांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे "महिन्याला 30 ते 40 इंजेक्शन्स मिळत असतील, तर 112 रुग्णांवर उपचार कसे करण्यात आले ?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.


* सकाळी इंजेक्शन नव्हते, मग 8 जणांना कसे दिले? :- संबंधित तरुणी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत आरोग्य केंद्रात उपस्थित होती. त्या काळात तिला इंजेक्शन संपल्याचे सांगण्यात आले. मात्र पत्रकारांनी चौकशी केली असता दुपारी 12 वाजेपर्यंत आठ जणांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे "जर इंजेक्शन उपलब्ध होते, तर त्या तरुणीला का देण्यात आले नाही ?" असा थेट सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.


* आयडी कार्डशिवाय कर्मचारी कार्यरत ? :- याशिवाय आरोग्य केंद्रातील अनेक कर्मचारी कोणतेही ओळखपत्र (आयडी कार्ड) न लावता कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कर्मचाऱ्यांनी आपण कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असून त्यांना आयडी कार्डच देण्यात आले नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.


* आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी की राजकीय दबावासाठी ? :- गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी सरकारी आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. मात्र जर कुत्रा चावलेल्या रुग्णालाही वेळेवर अँटी-रेबीज इंजेक्शन मिळत नसेल, राजकीय प्रभावाखाली उपचारांचे प्राधान्य ठरत असेल आणि कर्मचाऱ्यांकडून अयोग्य वर्तन होत असेल, तर नागरिकांनी सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवायचा कसा, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही आरोग्य केंद्रात अनेकदा उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसल्याचा आरोप केला आहे.


या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून इंजेक्शन वितरण, रुग्ण नोंदी, उपलब्धता, कर्मचारी वर्तन आणि प्रशासनिक कारभाराची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. खालापूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, रायगड जिल्हा आरोग्य विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची कितपत दखल घेतात आणि दोषींवर कारवाई करतात का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement