* आपल्या अंतर्मनातील अहंकार, क्रोध आणि लालसेची कुर्बानी द्या : काजी इमाम मौलाना आले मुस्तफा
नगरदेवळा / विशेष प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे गुरुवार, 28 मे रोजी मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि शांततामय वातावरणात साजरा केला. सकाळी साडेसात वाजता मुस्लिम बांधव जामा मस्जिद येथे एकत्र जमले आणि तेथून ईदगाहकडे प्रस्थान केले. ईदगाह येथे विशेष नमाज अदा करून अल्लाहचे स्मरण करण्यात आले तसेच तकबीर पठण करण्यात आले.
यावेळी नगरदेवळा जामा मस्जिदचे काजी इमाम मौलाना आले मुस्तफा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बकरी ईदचा खरा संदेश स्पष्ट केला. कुर्बानी द्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्या अंतर्मनात दडलेल्या अहंकार, क्रोध, लालसा आणि अज्ञानाची कुर्बानी द्यावी. बकरी ईद हा केवळ जनावराच्या कुर्बानीचा सण नसून, ईश्वराच्या मार्गांवर आपल्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याची शिकवण देणारा सण आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, अल्लाहने जर आपल्याला संपन्नता दिली असेल, तर पैशांच्या मोहाचा त्याग करून गरजू, अनाथ, विधवा आणि दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पुढे यावे. मानवतेची सेवा आणि गरजूंना आधार देणे हाच बकरी ईदचा खरा संदेश आहे. नमाजानंतर मौलाना आले मुस्तफा यांनी देशात आणि जगात शांतता, बंधुता आणि सौहार्द नांदावे, भारत देश अधिक विकसित व्हावा तसेच जगभर सुरू असलेले संघर्ष आणि युद्धे थांबून मानवतेचा विजय व्हावा, यासाठी विशेष दुआ (प्रार्थना) केली.
त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बकरी ईदच्या निमित्ताने नगरदेवळा येथे त्याग, सेवा, मानवता आणि जागतिक बंधुत्वाचा संदेश देत सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


Social Plugin