* प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप
* शासकीय बंदीला केराची टोपली
* शाळा-महाविद्यालय परिसरातही गुटखा सहज उपलब्ध
* धाडी होतात, पण विक्री थांबत नाही - पोलिस व प्रशासनावर गंभीर प्रश्न
कर्जत / विलास श्रीखंडे :- राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीवर कडक बंदी असतानाही कर्जत तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कर्जत शहरासह नेरळ, डिकसळ, कडाव, कशेळे, कळंब तसेच ग्रामीण भागातील पानटपऱ्या, किराणा दुकाने, हॉटेल परिसर आणि काही अमृततुल्य चहा विक्रेत्यांकडेही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या गुटखा विक्रीवर कठोर निर्बंध लागू केले असतांनाही स्थानिक पातळीवर नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “कर्जतमध्ये पोलिस प्रशासन नेमके करतंय तरी काय ?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
* युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात :- गुटखा विक्रीचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थी आणि युवा वर्गांवर होत असल्याचे दिसून येत आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरातही काही ठिकाणी सहज गुटखा उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गुटख्यामुळे तोंडाचा कर्करोग, दातांचे गंभीर विकार, मानसिक अस्थिरता, व्यसनाधीनता आणि शारीरिक कमजोरी यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे समाजाच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
* प्रशासनाला माहिती नाही, हे शक्यच नाही :- स्थानिक नागरिकांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असतांना संबंधित प्रशासनाला त्याची माहिती नसणे अशक्य आहे. त्यामुळे पोलिस आणि संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काही ठिकाणी केवळ दिखाऊ कारवाया केल्या जातात, मात्र, प्रत्यक्षात गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “धाडी पडतात, माल जप्त होतो, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा विक्री सुरू होते,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
* अवैध व्यवसायातून लाखोंची उलाढाल ? :- गुटखा विक्रीवर बंदी असल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवला जातो. मात्र यामधून संबंधित विक्रेते आणि पुरवठादार मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवत असल्याचे बोलले जात आहे. छोट्या पानटपरीवरूनही दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गुप्तपणे गुटखा पुरवठा केला जात असल्याची चर्चा असून या अवैध साखळीमुळे काही जण आर्थिक फायदा मिळवत असले तरी त्याची मोठी किंमत समाजाला मोजावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
* गुन्हेगारी आणि सामाजिक प्रश्नांमध्ये वाढ :- सामाजिक संघटनांच्या मते, गुटखा आणि तंबाखू व्यसनामुळे युवकांमध्ये मानसिक तणाव, गुन्हेगारी प्रवृत्ती, शैक्षणिक घसरण आणि आरोग्य समस्या वाढत आहेत. अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असून उपचारांवर मोठा खर्च करावा लागत आहे.
* कठोर कारवाईची मागणी :- नागरिकांनी प्रशासनाकडे गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, पुरवठा साखळी उघड करून मोठ्या पुरवठादारांवर गुन्हे दाखल करावेत, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी आदी मागण्या केल्या आहेत.
* युवकांमध्ये व्यसनमुक्ती आणि जनजागृती अभियान सुरू करावे :- एकीकडे व्यसनमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला जातो आणि दुसरीकडे तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे. आता तरी संबंधित विभाग जागे होऊन कठोर पावले उचलणार का ? याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Social Plugin