Type Here to Get Search Results !

उल्हासनगरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

* मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अदा केली नमाज

* शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा दिला संदेश

उल्हासनगर / सलीम मन्सूरी :- उल्हासनगर - 1 येथील मुस्लिम कब्रस्तान ईदगाह मस्जिद परिसरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना तसेच उल्हासनगर मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने विशेष नमाजाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाह मस्जिद येथे एकत्र जमले आणि ईद-उल-अजहाची विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे देशातील शांतता, बंधुभाव, प्रगती आणि मानवकल्याणासाठी प्रार्थना केली. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.


यावेळी ईदगाह मस्जिदचे मौलाना यांनी ईद-उल-अजहाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करतांना त्याग, समर्पण, दानशूरता आणि मानवसेवा हा या सणाचा मुख्य संदेश असल्याचे सांगितले. तसेच सण शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानून त्यांना शुभेच्छाही दिल्या.


ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन अल्लाहची इबादत करतात आणि समाजात प्रेम, बंधुता व सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संकल्प करतात. याच भावनेतून यंदाही उल्हासनगरमध्ये ईद-उल-अजहा साजरी करण्यात आली.


याप्रसंगी उल्हासनगर मुस्लिम कब्रस्तान दफनभूमी ट्रस्टचे सदर अब्दुल गफ्फार, डॉं. शाबुद्दीन, ताहीर शेख, मुन्नाभाई, अकलाख शेख, मोनू सिद्दीकी, फिरोज खान, सलीम खान, अल्लाउद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत ईद-उल-अजहाचा सण उल्हासनगरमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement