* चित्रकला, वक्तृत्व, जनरल नॉलेजपासून अभ्यासातही अव्वल ; 80.80 टक्के गुणांनी उंचावला उर्दू विभागाचा लौकिक
* मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षांतून करिअर घडवायचे - मुबश्शरा अ. सादिक
नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेषतः उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत विद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.
यामध्ये मुबश्शरा अब्दुल सादिक हिने 80.80 टक्के गुण मिळवत आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची पुन्हा एकदा छाप पाडली आहे. अभ्यास, चित्रकला, भाषण, जनरल नॉलेज, मेंहदी कला, स्टेज डेरींग अशा विविध क्षेत्रांत आघाडीवर असणारी मुबश्शरा विद्यालयात “ऑलराउंडर विद्यार्थिनी” म्हणून ओळखली जाते.
* पाचवी ते नववीपर्यंत सतत प्रथम क्रमांक :- मुबश्शराचे प्राथमिक शिक्षण उर्दू शाळेत झाले. लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य आणि शिस्त ठेवणाऱ्या या विद्यार्थिनीने पाचवी ते नववीपर्यंत सतत प्रथम क्रमांक पटकावत आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षकांच्या मते, तिच्या अभ्यासातील सातत्य, नीटनेटकेपणा आणि आत्मविश्वास यामुळेच ती प्रत्येक क्षेत्रात उठून दिसत होती.
* चित्रकलेतही चमकदार यश :- मुबश्शराने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे. तीने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई आयोजित Drawing Grade Examination मध्ये सहभाग घेतला होता. वर्ष 2024 मध्ये झालेल्या Elementary Grade Drawing Examination मध्ये तिने “Grade A” प्राप्त केला. तर 2025 मध्ये Drawing Grade Examination मध्ये “Grade B” मिळवत चित्रकलेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली.
तिच्या सुंदर आणि आकर्षक चित्रकलेसोबतच तिचे हस्ताक्षरही अत्यंत सुंदर, वळणदार आणि आखीव-रेखीव असल्याने शिक्षक तिचे नेहमी कौतुक करत असत.
* फक्त अभ्यासच नाही, व्यक्तिमत्त्व विकासही महत्त्वाचा :- 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'शी संवाद साधतांना मुबश्शराने आपल्या यशाबाबत मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली की, मी फक्त पुस्तकांपुरता अभ्यास केला नाही. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. भाषण, चित्रकला, जनरल नॉलेज, मेंहदी, स्टेजवरील कार्यक्रम यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
ती पुढे म्हणाली, वर्गात शिक्षक जे शिकवत होते ते मी लक्षपूर्वक ऐकत असे. घरी आल्यावर नियमित Revision करीत होते. अभ्यासात सातत्य ठेवले आणि वेळेचे योग्य नियोजन केले.
* कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव, शिक्षणातून बदल घडवण्याची जिद्द :- मुबश्शराचे वडील अब्दुल सादिक हे पेटींग आणि केळी कटाईचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात शब्बीर अहमद आणि जहीर अहमद हे सेटिंग कारागीर (बांधकाम कारागीर) म्हणून काम करतात. कष्टमय परिस्थितीत वाढलेल्या मुबश्शराला आपल्या आई-वडिलांचे हाल आणि मेहनत लहानपणापासून जवळून पाहायला मिळाली. याच जाणिवेतून तिने शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न पाहिले आहे.
* स्पर्धा परीक्षांतून करिअर घडविण्याचे ध्येय :- मुबश्शरा आत्मविश्वासाने सांगते की, मला पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्वतःचे करिअर घडवायचे आहे. मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. तिच्या बोलण्यातून संघर्षावर मात करण्याची जिद्द आणि स्वतःच्या मेहनतीवर असलेला विश्वास स्पष्ट दिसून येत होता.
* विद्यालयाचे वातावरण प्रेरणादायी :- मुबश्शराने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई-वडिलांना दिले. आमच्या शाळेचे वातावरण खूप चांगले आहे. शिक्षक नेहमी प्रोत्साहन देतात. कुठलीही अडचण आली तर समजावून सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले, असे ती म्हणाली.
‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत 80.80 टक्के गुण मिळवत अभ्यासासोबतच कला, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुबश्शरा अब्दुल सादिक हिला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तिची मेहनत, आत्मविश्वास, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आणि संघर्षातून पुढे जाण्याची जिद्द अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.
* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.


Social Plugin