* हिंगणे - पडवळ येथील दांपत्याला नोटीस
* 21 ला म्हाडा मुख्य अधिकाऱ्यांसमोर सुनावणी
* PMAY योजनेचा दुबार लाभ घेतल्याचा आरोप
* पत्रकार सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकरण चर्चेत
नवी मुंबई / प्रतिनिधी :- म्हाडाच्या सदनिकांबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांनी वेगवेगळ्या नावाने दोन सदनिका मिळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हाडाने संबंधित दांपत्याला नोटीस बजावली असून, येत्या 21 तारखेला म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा पत्रकार सुबोध सावंत यांनी केला असून माहिती अधिकार आणि कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हा कथित गैरप्रकार उघडकीस आणल्याचे सांगितले जात आहे.
* शिरढोण म्हाडा वसाहतीतील प्रकरण :- मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोण म्हाडा वसाहतीत विशाल बाळासाहेब हिंगणे यांना बिल्डिंग क्रमांक 1/अ, रूम क्रमांक 206 येथे सदनिका मिळाली आहे. तर त्यांची पत्नी कांचन विश्वास पडवळ यांना बिल्डिंग क्रमांक
1/बी, रूम क्रमांक 303 येथे स्वतंत्र सदनिका मिळाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पती-पत्नी असून त्यांना दोन अपत्ये असल्याची माहिती आहे. तरीदेखील पत्नीने विवाहानंतर जुने नाव कायम ठेवून स्वतंत्र लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
* जुन्या नावाने लाभ घेऊन शासनाची फसवणूक ? :- तक्रारीनुसार, संबंधित दांपत्याने विवाहाची माहिती आणि कौटुंबिक संबंध लपवून ठेवत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत दुबार लाभ घेतल्याचा आरोप आहे.
नियमानुसार विवाहानंतर पत्नीने पतीचे नाव लावणे अपेक्षित असते. मात्र शासनाची दिशाभूल करण्यासाठी आणि एकाच कुटुंबाला मिळणारा लाभ दोन वेगवेगळ्या व्यक्तींना मिळवून देण्यासाठी नावामध्ये बदल न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच मिळणाऱ्या PMAY योजनेचा लाभ दोन जणांना कसा देण्यात आला ? असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
* लाखोंच्या अनुदानाचाही लाभ ? :- म्हाडा प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे संबंधित सदनिकाधारकांना सुमारे ₹1,43,090 इतकी 10 टक्के अनुदानाची रक्कम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच PMAY अंतर्गत प्रत्येकी ₹2,50,000 चा लाभही मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे.
* गरजूंना घर मिळावे की नियम मोडणाऱ्यांना ? :- या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक खरोखर गरजू कुटुंबे आजही घराच्या प्रतीक्षेत असतांना, कथितरीत्या नियमांना बगल देऊन दुबार लाभ घेतल्याचे आरोप गंभीर मानले जात आहेत. शासनाच्या योजनांचा फायदा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
* चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी :- पत्रकार सुबोध सावंत यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधितांकडून मिळालेली सर्व अनुदान रक्कम आणि PMAY योजनेंतर्गत मिळालेला लाभ 18 टक्के व्याजासह वसूल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाची फसवणूक, खोटी माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
* 21 तारखेकडे सर्वांचे लक्ष :- या प्रकरणाची सुनावणी 21 तारखेला म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात होणार असल्याने आता या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधितांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे म्हाडाच्या लाभ वाटप प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी अधिक कठोर पडताळणीची गरज व्यक्त केली जात आहे.


Social Plugin