* कटलरी व्यावसायिकाच्या मुलीची जिद्दीची कहाणी
* रोझमीन रईस तांबोळीला 82.60 टक्के गुण
* मला शिक्षक बनून शिक्षित पिढ्या घडवायच्यात
* 16 वर्षीय रोझमीनचे प्रेरणादायी मनोगत
जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर कोणतीही भाषा, कोणतीही अडचण आणि कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे नगरदेवळा येथील रोझमीन रईस तांबोळी हिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. कटलरी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील या 16 वर्षीय विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 82.60 टक्के गुण मिळवत उर्दू विभागात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे रोझमीनचे पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. सहावीपर्यंत तिचा उर्दू भाषेशी कोणताही संबंध नव्हता. मात्र सातवीत नगरदेवळा येथे उर्दू माध्यमात प्रवेश घेतल्यानंतर केवळ एका महिन्याच्या शिकवणीच्या जोरावर तिने उर्दू भाषा आत्मसात केली आणि पुढे सातवी, आठवी, नववी व दहावीत सातत्यपूर्ण प्रगती करीत घवघवीत यश संपादन केले.
* कष्टकरी कुटुंबातील जिद्दीची मुलगी :- रोझमीनचे वडील रईस मजीद तांबोळी हे बनोटी, नगरदेवळा, भडगाव आणि वाघळी परिसरात कटलरी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तिची आई नसीम रईस तांबोळी या गृहिणी असून त्यांनीही दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. रोझमीनचे आजोबा मजीद आमद बागवान हे पान विक्रेते आहेत. घरातील साधी परिस्थिती, मेहनती आई-वडिलांचे कष्ट आणि शिक्षणाची ओढ या सर्वांनी रोझमीनच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला.
तिची धाकटी बहीण शिफा रईस तांबोळी यावर्षी सहावी पास झाली तर भाऊ हमजा रईस तांबोळी नववीत शिक्षण घेत आहे.
* मराठी माध्यमातून उर्दूकडे…संघर्षमय सुरुवात :- रोझमीनचे प्राथमिक शिक्षण पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे मामाच्या गावी मराठी माध्यमातून झाले. सहावीपर्यंत तिला उर्दूची ओळखदेखील नव्हती. मात्र सातवीत नगरदेवळा येथील उर्दू शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. त्याआधी केवळ एक महिना तिने अन्नू मेंबर यांच्या पत्नींकडे उर्दू भाषेची शिकवणी घेतली. सुरुवातीला उर्दू माध्यमात अडचणी आल्या, भाषेचा अडथळा जाणवला, पण तिने हार मानली नाही. सातवीत संघर्ष करीत शिकलेली ही मुलगी पुढे आठवी, नववी आणि दहावीत उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाचा अभिमान ठरली.
* शिक्षक जे शिकवायचे, ते घरी जाऊन Revision करायचे :- 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'शी संवाद साधतांना रोझमीनने आपल्या अभ्यासाचे तंत्र, परिश्रम आणि भविष्यातील ध्येयाबाबत मनोगत व्यक्त केले.
ती म्हणाली, मी अभ्यासाबाबत खूप गंभीर होते. वर्गात शिक्षक जे शिकवायचे, ते घरी आल्यावर पुन्हा revision करायचे. रोजचा अभ्यास रोज पूर्ण करण्यावर भर दिला.
ती पुढे म्हणाली, आई-वडिलांचे कष्ट लहानपणापासून पाहत होते. त्यामुळे शिक्षण घ्यायचेच आणि चांगले गुण मिळवायचे, हे मी मनाशी ठरवले होते.
* सुंदर हस्ताक्षर आणि अभ्यासातील शिस्त :- रोझमीनचे अक्षर अतिशय सुंदर, वळणदार आणि आखीव-रेखीव आहे. शिक्षकांनाही तिच्या लिखाणाचे नेहमीच कौतुक वाटत असे. अभ्यासात सातत्य, नीटनेटकेपणा आणि शिस्त यामुळेच तिला चांगले यश मिळाल्याचे शिक्षकांचे मत आहे.
* मला शिक्षक बनून पिढ्या घडवायच्या आहेत :- भविष्यातील ध्येयाबाबत बोलताना रोझमीन आत्मविश्वासाने म्हणाली, मला पुढे शिक्षक व्हायचे आहे. बारावीनंतर D.Ed करून शिक्षण क्षेत्रात काम करायचे आहे. माझ्यासारख्या अनेक मुलांना ज्ञानाची शिदोरी द्यायची आहे. शिक्षित पिढ्या घडविण्याचे काम करायचे आहे. फक्त स्वतःपुरते यश न पाहता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना तिच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होती.
* ग्राम शिक्षण समिती आणि शिक्षकांचे मानले आभार :- रोझमीनने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले.
ती म्हणाली, विद्यालयातील शिक्षकांनी खूप सहकार्य केले. समजत नसलेले विषय पुन्हा समजावून सांगितले. शाळेचे वातावरण खूप चांगले असल्यामुळे अभ्यासात सातत्य राहिले.
* उर्दू विभागात उल्लेखनीय यश :- नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेषतः उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत विद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.
'दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- मराठी माध्यमातून उर्दू माध्यमात यशस्वी प्रवास करीत दहावीत 82.60 टक्के गुण मिळवणाऱ्या रोझमीन रईस तांबोळी हिला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तिची मेहनत, शिस्त, जिद्द आणि शिक्षिका बनून समाज घडविण्याचे स्वप्न निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, हीच सदिच्छा.
* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.



Social Plugin