* 30 वर्षांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर सेवानिवृत्त
* सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भावपूर्ण निरोप
नगरदेवळा / सैय्यद मुजफ्फर अली :- नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दशकांपासून निष्ठेने व समर्पित भावनेने रुग्णसेवा बजावणाऱ्या परिचर श्रीमती उषाबाई सुभाष पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवार, 30 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉं. योगेश पाटील होते. यावेळी त्यांच्या हस्ते श्रीमती उषाबाई पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभात बोलताना डॉं. योगेश पाटील यांनी उषाबाई पाटील यांच्या प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेचा गौरव केला. रुग्णसेवा हेच कर्तव्य मानून त्यांनी अनेक वर्षे आरोग्य विभागात उल्लेखनीय योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आरोग्य सहाय्यक सुधीर जगताप, औषध निर्माण अधिकारी रवींद्र पाटील, आरोग्य सेवक कौशल पाटील, अमोल गढरी, गोपाल पवार, लॅब टेक्निशियन भूषण पवार, परिचर हेमंत जावळे, आरोग्य सेविका पौर्णिमा बुजाडे, प्रियंका चौधरी तसेच आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी आपल्या मनोगतात श्रीमती उषाबाई पाटील यांच्या मनमिळावू स्वभावाचे, कर्तव्यदक्षतेचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. त्यांच्या सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत त्यांना निरोगी, आनंदी आणि सुखमय निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देतांना श्रीमती उषाबाई पाटील यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगत सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले. मिळालेल्या सहकार्यामुळेच आपण यशस्वीपणे सेवा पूर्ण करू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सेवापूर्ती समारंभाने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण केल्या. आरोग्य केंद्रातील सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.


Social Plugin