* प्रस्तावित डंपिंग ग्राउंडचा प्रस्ताव अखेर कायमस्वरूपी रद्द ; माणकिवली ग्रामस्थांच्या एकजुटीला यश
* प्रशासक तथा ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांचे ग्रामस्थांकडून आभार
कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- कर्जत तालुक्यातील माणकिवली गावालगत प्रस्तावित करण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंडला ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधाला अखेर यश मिळाले असून कडाव ग्रामपंचायत प्रशासनाने सदर प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव तसेच स्थानिक शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणकिवली गावाच्या रस्त्यालगत तसेच आदिवासी वस्तीच्या शेजारी डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव कडाव ग्रामपंचायतीकडून पुढे आणण्यात आला होता. 27 जून 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावानुसार सर्व्हे क्रमांक 137/17 या जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच गावात तीव्र नाराजी पसरली होती.
सदर प्रस्तावित जागेजवळ आदिवासी लोकवस्ती, अंगणवाडी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची नियमित वर्दळ असून ग्रामदैवत “सातीचे देव” यांचे स्थान देखील याच परिसरात असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. डंपिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, माशा-मच्छरांचा प्रादुर्भाव, दूषित पाण्याचा धोका निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
यासंदर्भात माणकिवली ग्रामस्थ, महिला मंडळ, आदिवासी बांधव तसेच स्थानिक शेतकरी यांच्या वतीने कडाव ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले होते. ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करीत संबंधित प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच प्रस्ताव मागे न घेतल्यास आंदोलन, उपोषण आणि कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता.
दरम्यान, ग्रामस्थांचा वाढता विरोध, स्थानिकांमधील संताप तसेच सामाजिक वातावरण लक्षात घेता अखेर कडाव ग्रामपंचायतीने माणकिवली गावालगत प्रस्तावित करण्यात आलेला डंपिंग ग्राउंड प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा प्रशासक प्रेमसिंग गिरासे यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांना माहिती दिली.
यावेळी संबंधित जागेत भविष्यात ग्रामपंचायतीमार्फत कोणत्याही प्रकारचे कामकाज करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात अधिकृत लेखी पत्र देण्याची मागणी केली असून त्यावर प्रशासक प्रेमसिंग गिरासे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि स्थानिक शेतकरी यांच्या एकजुटीमुळे अखेर हा प्रस्ताव रद्द झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासक तथा ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण, आरोग्य आणि ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.


Social Plugin