* आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
* ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या ओजस्वी किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
नगरदेवळा / केपी न्यूज ब्युरो :- शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख, जि. प. जळगाव शिवसेना गटनेते तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरदेवळा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य जाहीर किर्तन सोहळा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
महाराष्ट्राचे विनोद सम्राट, झी 24 तास फेम सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी आपल्या ओजस्वी, विनोदी आणि समाजप्रबोधनात्मक शैलीत सुश्राव्य व सुमधूर किर्तन सादर केले. त्यांच्या किर्तनातून अध्यात्म, संस्कार, समाजजागृती आणि विनोद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित भाविकांनी टाळ्या आणि हरिनामाच्या गजरात किर्तनाचा मनमुराद आनंद लुटला.
किर्तन कार्यक्रमानंतर आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, केक कापून जल्लोष तसेच गुलाब फुलांचा भव्य हार आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
रावसाहेब मनोहर गिरधर पाटील हे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रम, जनसंपर्क आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून धार्मिक वातावरणात समाज एकतेचा आणि संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी तसेच नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, शिवसैनिक, भाविक आणि कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Social Plugin