* विरारमधून क्षितिज ठाकूर की राजीव पाटील ?
* ठाणे-पालघर मतदारसंघात हालचालींना वेग
* शिंदे सेना आणि भाजपच्या संभाव्य रणनीतींमुळे राजकीय चर्चांना उधाण
वसई / नरेंद्र एच. पाटील :- आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विरारमधून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते तथा माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि वसई-विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांची नावे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी विरार येथे क्षितिज ठाकूर यांची घेतलेली भेट या चर्चेला अधिक बळ देणारी ठरली.
या भेटीनंतर पालघर जिल्ह्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन बहुजन विकास आघाडी आणि शिंदे सेना यांच्यातील संभाव्य राजकीय जवळीक वाढू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या या संभाव्य खेळीला उत्तर देण्यासाठी भाजपनेही आपली रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपचे खासदार डॉं. हेमंत सावरा, आमदार राजन नाईक आणि माजी महापौर राजीव पाटील यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अचानक राजीव पाटील यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे येऊ लागले आहे.
गेल्या काही वर्षांत राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिले आहेत. विधानसभा निवडणूक तसेच वसई-विरार महापालिका निवडणूक प्रचारातही त्यांची भूमिका तुलनेने मर्यादित राहिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊन स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी महापौर राजीव पाटील यांनी भाजपकडून कोणताही औपचारिक प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र खासदार डॉं. हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांच्यासोबत बैठक झाल्याचे त्यांनी मान्य केले. रेल्वे संबंधित प्रश्न आणि इतर स्थानिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ते परिसरात आले होते. माझे कार्यालय त्याच मार्गांवर असल्याने ते चहासाठी आले होते. त्यावेळी रेल्वे आणि स्थानिक विकासाच्या विषयांवर चर्चा झाली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, राजकीय निरीक्षकांच्या मते, या भेटीमागे केवळ स्थानिक प्रश्नांची चर्चा होती की त्यापेक्षा मोठे राजकीय गणित दडले आहे, याबाबत उत्सुकता कायम आहे.
सध्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील समीकरणे वेगाने बदलत असून शिंदे सेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील संभाव्य राजकीय डावपेचांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाईल की माजी महापौर राजीव पाटील यांच्यावर भाजप विश्वास दाखवेल, याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असला तरी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, "विरारमधून विधान परिषदेसाठी अखेर क्षितिज ठाकूर की राजीव पाटील ?" हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे.


Social Plugin