* बुडणाऱ्यांसाठी काही सेकंदांत मदतीला धावणारे आधुनिक जीवरक्षक तंत्रज्ञान
अलिबाग / ओमकार नागावकर :- नागाव बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली असून “रोबोटिक बोयो” हे आधुनिक जीवरक्षक उपकरण प्रत्यक्ष बचावकार्यात प्रभावी ठरत असल्याचे आज झालेल्या प्रात्यक्षिकातून स्पष्ट झाले. पाण्यात अडकलेल्या किंवा बुडणाऱ्या व्यक्तींपर्यंत काही क्षणांत पोहोचून मदत करणाऱ्या या आधुनिक यंत्रणेमुळे नागाव बीचवरील सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.
नागाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे प्रात्यक्षिक कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्यांनी “रोबोटिक बोयो”च्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली तसेच या यंत्रणेद्वारे समुद्रकिनाऱ्यावरील बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावी होणार असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले.
“पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘रोबोटिक बोयो’ हे खऱ्या अर्थाने जीवनरक्षक तंत्रज्ञान आहे. पर्यटनस्थळांवर अशा आधुनिक उपाययोजनांची गरज असून नागाव ग्रामपंचायतीने केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,” असे मत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
या प्रात्यक्षिकावेळी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉं. सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉं. रवींद्र शेळके, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. विशेषतः सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, पर्यटकांची माहिती नोंदविण्यासाठी प्रभावी प्रणाली उभारणे तसेच बीच परिसरातील सुविधा अधिक आधुनिक आणि सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, सरपंच हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायतीने पर्यटन विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. बीच सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल राखत नागावला आदर्श पर्यटनस्थळ बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“रोबोटिक बोयो”सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा नागावच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून नागाव बीच भविष्यात राज्यातील सर्वात सुरक्षित, सुसज्ज आणि आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.


Social Plugin