* गळा चिरून दुहेरी हत्याकांड
* मृतदेहांवर टाकला पालापाचोळा
* फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी
* विविध अंगांनी पोलीस तपास सुरू
खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 26) उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांची नावे रघुनाथ दत्तू फराट (वय 75) आणि सुरेखा रघुनाथ फराट (वय 72) अशी आहेत. रघुनाथ फराट हे बँकेतून सेवानिवृत्त झाले होते. ते पत्नीसमवेत निगडोली गावात वास्तव्यास होते, तर त्यांची मुले खोपोली आणि खालापूर येथे राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांना संशय आला. काहीतरी अघटित घडल्याची भीती वाटल्याने त्यांचा नातू आदित्य फराट याला निगडोली येथील घरी पाठविण्यात आले. आदित्यने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने त्याने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला.
घरात शिरताच आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच आदित्यने आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी रघुनाथ फराट यांचा धारदार शस्त्राने गळा चिरला होता, तर सुरेखा फराट यांच्या तोंडावर गंभीर वार करण्यात आले होते. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा क्रूरतेपोटी मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून घरातील विविध पुरावे गोळा करण्यात आले. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली की जुन्या वादातून, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करीत आहेत.
या दुहेरी हत्याकांडामुळे निगडोली गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.


Social Plugin