* गळती रोखण्यासाठी यंदाही प्लॅस्टिकचाच आधार
* तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालयासह अनेक कार्यालयांत पावसाळ्यात गळती
* कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार ? नागरिकांचा सवाल
कोर्लई - मुरूड / राजीव नेवासेकर :- मुरुड शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये पावसाळा सुरू होताच गळतीची समस्या पुन्हा एकदा समोर आली असून यंदाही कार्यालयांच्या छतांवर प्लॅस्टिक टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मात्र बासनात गुंडाळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुरुड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, वनविभाग, सेतू कार्यालय, ग्रामीण रुग्णालय यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, सरकारी नोंदी तसेच नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित फाईल्स ठेवण्यात येतात.
तालुक्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने नागरिक शासकीय कामांसाठी येथे येत असतात. मात्र पावसाळा सुरू झाला की या कार्यालयांमध्ये गळतीची समस्या गंभीर बनते. छतांमधून पाणी झिरपणे, कार्यालयीन कागदपत्रे भिजण्याचा धोका तसेच कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना होणारा त्रास ही परिस्थिती दरवर्षीचीच बनली आहे. यावर कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी छतांवर प्लॅस्टिक टाकून तात्पुरता तोडगा काढला जात असल्याचे समोर आले आहे.
विशेषतः तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयातील गळतीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. ग्रामीण रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही पावसाळ्यात गळती होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी लाखो रुपयांचा निधी विविध दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी मंजूर होत असतांना शासकीय कार्यालयांची अवस्था अशी का ? प्रशासनाला केवळ प्लॅस्टिक टाकून वेळ मारून न्यायची आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
काही कार्यालयांमध्ये महत्त्वाचे दस्तावेज आणि अभिलेख ठेवलेले असतांना गळतीमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शासकीय कार्यालयांच्या छतांवर प्लॅस्टिक दिसू लागल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार ? हा प्रश्न नागरिकांच्या मनात कायम आहे.


Social Plugin