* पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या अभिनव परसबाग उपक्रमाचा गौरव
* जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सन्मान
लातूर / प्रतिनिधी :- लातूर येथील दयानंद सभागृहात 23 मे 2026 रोजी लायन्स क्लब लातूर सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात नागपूरच्या दिपाली श्रीपत राठोड आणि अंजली श्रीपत राठोड या दोघी बहिणींना प्रतिष्ठेचा "सन्मान कर्तृत्वाचा" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार लातूरचे जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या शुभहस्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब लातूर सिटीचे अध्यक्ष नागनाथ गिते होते, तर न्यूज 18 मराठीचे सहाय्यक संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार विलास बडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुरस्कार विजेत्या दिपाली आणि अंजली राठोड यांच्या आई जयश्रीताई राठोड व वडील श्रीपत राठोड हे देखील उपस्थित होते. आपल्या मुलींच्या यशाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.
* घराच्या छतावर उभारली अनोखी जैविक परसबाग :- दिपाली आणि अंजली राठोड या दोघी बहिणींनी आपल्या घराच्या छतावर "वसंतराव नाईक परसबाग" उभारून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. पूर्णतः जैविक पद्धतीने विकसित केलेल्या या परसबागेत फळझाडे, फुलझाडे, वेली, फळभाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती आणि विविध प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश असून सुमारे 90 प्रकारांच्या 700 हून अधिक वनस्पती त्यांनी जोपासल्या आहेत.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे त्यांची परसबाग पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. देशभरातील अनेक मान्यवरांनी या परसबागेला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि जनजागृती क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा विविध स्तरांवर गौरव करण्यात आला आहे.
* बंजारा समाजाचा अभिमान :- बंजारा समाजातील या होतकरू आणि कर्तृत्ववान मुलींना मिळालेल्या राज्यस्तरीय सन्मानामुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील गोर सिकवाडी आणि गोर सेना संघटनांच्या वतीने दिपाली व अंजली राठोड तसेच त्यांच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक, लेखक व समाजप्रबोधनकार बळीराम जाधव यांनी लिखित "गोरमाटी भाषा शब्दकोश" हा अनमोल ग्रंथ दोघींना भेट देण्यात आला.
याप्रसंगी बळीराम जाधव, डॉं. राम पवार, अर्जून राठोड, प्रसाद पवार, संदीप चव्हाण, उद्धव चव्हाण, बालाजी राठोड, वैष्णवी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच लातूर दौऱ्यादरम्यान विविध सामाजिक संस्था व मान्यवरांच्या वतीने दिपाली आणि अंजली राठोड यांचे विशेष स्वागत करण्यात आले. त्यांच्या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे, शेख परवीन, शेख दिलावर आणि परमेश्वर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Social Plugin