Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथील अग्नावंती नदी पात्राचे खोलीकरण करा !

* युवा नेत्या अभिलाषा रोकडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

* पावसाळ्यात पूरस्थितीमुळे गावाचा संपर्क तुटण्याची भीती

* नदीपात्रात 15 ते 20 फूट खोलीकरण करण्याची मागणी

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावातील नदीपात्राचे तातडीने खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात वारंवार निर्माण होणारी पूरस्थिती, गावाचा तुटणारा संपर्क आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर अडचणी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरदेवळा हे पाचोरा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव मानले जाते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने नदीपात्र भरून वाहते. गावाच्या दक्षिणेकडील मध्यवर्ती मध्यम प्रकल्पामुळे तसेच नदीवरील बंधाऱ्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.


गावातून वाहणाऱ्या नदीमुळे नगरदेवळा गावाचे दोन भाग पडतात. नदीवर दोन छोटे पूल असून मुसळधार पावसामुळे पुलांवरून पाणी वाहू लागते. परिणामी गावाचा संपर्क तुटतो आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे गावातील मुख्य बाजारपेठ नदीकाठालगत असल्याने पूराच्या पाण्याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसतो. अनेक दुकानदारांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे आपत्कालीन सेवा देखील प्रभावित होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.


एखाद्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडल्यास गावाबाहेर उपचारासाठी नेणे कठीण होते. यापूर्वी काही नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा देखील निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अंत्यविधी, शालेय शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारांवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


निवेदनानुसार, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून जर 15 ते 20 फूट खोलीकरण करण्यात आले तर पूराचे पाणी वेगाने पुढे जाईल आणि पुलांवर पाणी येण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे गावाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या निवेदनावर या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाचोरा तहसीलदार यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement