Type Here to Get Search Results !

भडगाव महाराष्ट्रात की बिहारात ? वाढत्या गुन्हेगारीने नागरिक भयभीत

* मटका, जुगार, गावठी दारू, गांजा विक्रीला उधाण

* पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त सवाल

* सामान्यांना कायदा आणि गुन्हेगारांना मोकळीक ?

* संतापलेल्या भडगावकरांचा प्रशासनाला थेट सवाल

भडगाव / निलेश महाले :- भडगाव शहर आणि तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम सुरू असलेले मटका, जुगार, गावठी दारू विक्री, गांजा तसेच इतर अंमली पदार्थांचे वाढते जाळे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विशेष म्हणजे काही अवैध धंदे पोलिस स्टेशनच्या हद्दीतच सुरू असल्याच्या चर्चांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. “शहरात सर्व काही उघडपणे सुरू असतांना पोलिसांना दिसत नाही का ?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.


* चाकूहल्ले, टोळक्यांचा वाढता वावर :- गेल्या काही महिन्यांत शहरात मारामाऱ्या, गटांतील संघर्ष, चाकूहल्ले, टोळक्यांचा वाढता वावर आणि दहशतीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. काही भागांमध्ये सायंकाळनंतर नागरिकांना बाहेर पडतांना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. महिला, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि पालकांनी शहरातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “भडगाव पूर्वीसारखे सुरक्षित राहिले नाही,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक देत आहेत.


* तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात :- गावठी दारू, गांजा आणि इतर अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पालकांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की, आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. व्यसनांमुळे अनेक घरांची परिस्थिती बिघडत आहे, मात्र प्रशासनाकडून धडक कारवाई होताना दिसत नाही. यात्रा, उत्सव आणि सणांच्या काळात अवैध धंद्यांना अधिक उधाण येत असल्याचेही समोर आले आहे.


* दारू-जुगारामुळे संसार उद्ध्वस्त :- अनेक महिलांनी घरातील पुरुष व्यसनाधीन होत असल्याची वेदना व्यक्त करीत प्रशासनाने तातडीने धडक मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. दारू आणि जुगारामुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. घरातील शांतता हरवत चालली आहे. कष्टाने कमावलेले पैसे व्यसनात जात आहेत, अशी संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.


* प्राणघातक हल्ल्यानंतरही कारवाई नाही ? :- 19 एप्रिल रोजी भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात सागर पाटील नामक व्यक्तीने अनिल नाना भोई यांच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनेला दीड महिना उलटूनही संबंधित आरोपीविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


* एका प्रकरणात तातडीची कारवाई, दुसऱ्यात शांतता का ? :- काही दिवसांपूर्वी वडजी गावातील एका आदिवासी तरुणाने सोशल मीडियासाठी तलवार हातात घेऊन व्हिडिओ रील तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत त्याला अटक केली होती. मात्र, गंभीर स्वरूपाच्या चाकूहल्ला प्रकरणात कारवाई का होत नाही ? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. एका प्रकरणात तातडीची कारवाई आणि दुसऱ्या गंभीर प्रकरणात शांतता का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.


* आर्थिक हितसंबंधांच्या चर्चांना उधाण :- या प्रकरणामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून आरोपी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध आहेत काय ? अशी शंका काही नागरिक व्यक्त करीत आहेत. गंभीर हल्ला होऊनही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा ? असा संतप्त सवाल आता भडगावकर उघडपणे करू लागले आहेत.


* पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान :- काही महिन्यांपूर्वी प्रभारी म्हणून नियुक्त झालेल्या नव्या पोलिस अधिकाऱ्यांसमोर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


* नागरिकांच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत :- रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी, टोळी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करावी, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करावी, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, गंभीर गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी करावी.


* भडगाव पुन्हा सुरक्षित व्हावे :- भडगाव शहर पुन्हा शांत, सुरक्षित आणि गुन्हेमुक्त व्हावे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आम्हाला फक्त कागदी कारवाया नकोत, प्रत्यक्ष आणि कठोर अंमलबजावणी हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि संशयित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होतांना दिसत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement