* सरदार एस. के. पवार विद्यालयातील दहावीत प्रथम येणारी विद्यार्थिनी ; 94.60 टक्के गुणांनी परिसरात कौतुक
* मैत्रिणींसोबत चर्चा, Revision आणि सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे गमक - दिव्या महाजन
नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करीत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. या यशामध्ये शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी दिव्या रूपेश महाजन हिने 94.60 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी म्हणून तीची विशेष ओळख निर्माण झाली आहे.दिव्या महाजन हिच्या यशाची नगरदेवळा परिसरात सर्वत्र चर्चा सुरू असून तिच्या मेहनतीसोबतच “ग्रुप स्टडी” या अभ्यासपद्धतीचीही प्रशंसा होत आहे. विशेष म्हणजे, तिच्या मैत्रिणींच्या अभ्यासगटातील सर्वच विद्यार्थिनींनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयात नवा आदर्श निर्माण केला आहे.
* शेतकरी कुटुंबातील मुलीची यशोगाथा :- दिव्या ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील रूपेश सुरेश महाजन हे शेती करतात, तर आई हेमलता रूपेश महाजन यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. घरात दोन लहान बहिणी अप्रिता (इयत्ता सातवी) आणि तेजल (इयत्ता चौथी) तसेच चार वर्षांचा भाऊ आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून येणाऱ्या दिव्याने मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजनाच्या जोरावर हे मोठे यश मिळवले आहे.
* जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास :- दिव्याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण निपाणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्याच काळात दीपक हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने डिजिटल शिक्षणाची ओळख करून घेतली. के. एस. शाह मॅडम या तिच्या दहावीच्या क्लास टीचर होत्या. त्यांनी तिला अभ्यासाची गोडी निर्माण केली आणि योग्य दिशा दिली.
* ग्रुप स्टडीमुळे आत्मविश्वास वाढला :- 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'शी संवाद साधतांना दिव्याने आपल्या यशाचे रहस्य उलगडले. ती म्हणाली की, मी वर्षभर सातत्याने मेहनत घेतली. शाळेत जे शिकवले जात होते ते लक्षपूर्वक समजून घेत होते आणि घरी आल्यावर त्याचे नियमित Revision करीत होते.
ती पुढे म्हणाली, आमचा मैत्रिणींचा ग्रुप स्टडी होता. भूमी प्रकाश परदेशी, निकिता विजय महाजन, साक्षी अनिल धनराळे, तेजश्री स्वप्नील पाटील आणि प्राप्ती शरद पाटील या मैत्रिणींसोबत आम्ही सतत अभ्यास आणि परीक्षेबाबत चर्चा करीत असू. एखादा प्रश्न समजला नाही किंवा अडचण आली तर आम्ही एकमेकींना समजावून सांगत होतो. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा वाटत गेला.
* YouTube आणि डिजिटल माध्यमांचाही प्रभावी उपयोग :- दिव्या म्हणाली की, होमवर्क नियमित आणि व्यवस्थित करणे ही माझी सवय होती. एखादा टॉपिक पूर्णपणे समजला नाही तर मी YouTube वरून तो पुन्हा समजून घेत असे. शाळेचे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवत होते आणि डाऊट लगेच क्लिअर करून सांगत होते. पण Revision म्हणून मी काही गोष्टी डिजिटल माध्यमातूनही समजून घेत होते. तिच्या मते, आजच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा योग्य वापर केला तर अभ्यास अधिक प्रभावी पद्धतीने करता येतो.
* JEE देऊन कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न :- दिव्याने आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल सांगताना म्हटले की, मला पुढे JEE परीक्षा देऊन Computer Engineering क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी मी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तिच्या बोलण्यातून आत्मविश्वास, मेहनतीची तयारी आणि मोठे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द स्पष्टपणे जाणवत होती.
* मैत्रिणींचा ग्रुप ठरला विद्यालयाचा “स्टार ग्रुप” :- दिव्याच्या मैत्रिणी भूमी प्रकाश परदेशी, निकिता विजय महाजन, साक्षी अनिल धनराळे, तेजश्री स्वप्नील पाटील आणि प्राप्ती शरद पाटील या सर्व विद्यार्थिनींनीही 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयात विशेष छाप पाडली आहे. “ग्रुप स्टडी”मधून एकमेकींना साथ देत या विद्यार्थिनींनी यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
* विद्यालय, शिक्षक आणि ग्राम शिक्षण समितीचे मानले आभार :- दिव्याने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आई-वडिलांना दिले. शाळेतील शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने शिकवत होते. अभ्यासात कुठलीही अडचण आली तर त्यांनी नेहमी मदत केली. विद्यालयाचे वातावरण खूप प्रेरणादायी आहे, असे ती म्हणाली.
‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवत सरदार एस. के. पवार विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या दिव्या रूपेश महाजन हिला ‘दैनिक कोकण प्रदेश न्यूज’ परिवाराकडून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तिची मेहनत, जिद्द, सकारात्मक विचार आणि अभ्यासातील सातत्य भविष्यात तिला मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचवो, हीच सदिच्छा. दिव्याची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि मेहनतीचे महत्त्व पटवून देणारी ठरत आहे.
* शब्दांकन : फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दैनिक कोकण प्रदेश न्यूज) मो. 8454886853.


Social Plugin